राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अचानक मुक्काम नागपूरला का ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/MH-goverment_8_20191123.jpg)
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आजपासून म्हणजे २२जुलै पासून आपला मुक्काम नागपूरला हलवला आहे. मात्र, कोणतीही सभा, बैठक किंवा कोणताही कार्यक्रम नसताना राज्यपालांनी अचानक आपला मुक्काम नागपूरला हलवण्यामागचे कारण काय ? हे अद्याप समजू शकलेले नाही.
त्याचप्रमाणे, हे पुन्हा नागपूरहून मुंबईला कधी परतणार ? याबाबतचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, सध्या यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असली तरीही अद्याप राजभवनाकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
मुंबईतील कोरोनास्थिती गंभीर आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग राजभवनापर्यंत पोहोचला आहे. राजभवनात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यपालांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपला मुक्काम नागपूरला हलवल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यपालांच्या नियोजित वेळापत्रकात कोणत्याही कार्यक्रम, सभा, बैठकीचा त्याचप्रमाणे त्यांच्या मुंबई परतीचा देखील उल्लेख नसल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.