‘पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारचे मोठे यश’, पाकिस्तान मंत्र्याचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pakistan.jpg)
इस्लामाबाद – दोन वर्षांपूर्वी भारताच्या पुलवामा येथे भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला म्हणजे इम्रान खान सरकारचे मोठे यश असल्याचे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी या हल्ल्याची खुलेपणाने कबुली दिलेली आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत गुरुवारी चर्चेत सहभागी झाले असताना हे वक्तव्य केले आहे.
पुलवामा हल्ला हा इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान सरकारचे मोठे यश आहे. फवाद चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे खासदार अय्याज सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याच्या मुद्यावरून पाकिस्तान सरकारवर जोरदार हल्ला बोल केला होता. पाकिस्तान सरकार भारताच्या हल्ल्याला घाबरले होते, असाही दावा त्यांनी केला. त्याला उत्तर देताना फवाद चौधरी यांनी सरकार भारताला उत्तर देण्यास भक्कम असल्याचे म्हटले. भारताने नव्हे तर पाकिस्तानने भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारले. पुलवामा तर मोठे यशच असल्याचे फवाद यांनी सांगितले.
पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्धवस्त केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.