दिल्ली दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या उमर खालिदच्या सुटकेसाठी 200 जणांचे संयुक्तिक पत्र
नवी दिल्ली – दिल्ली दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या उमर खालिद याची सुटका करावी या मागणीसाठी आता शिक्षणतज्ज्ञ, कलाकार आणि लेखक मंडळींचा एक गट पुढे सरसावला आहे. उमर खालिदच्या सुटकेसाठी तब्बल 200 जणांनी एक संयुक्तिक पत्र काढले आहे. यात नोआम चौमस्की, मीरा नायर, अभिनेत्री रत्ना पाठक शहा, अमितक घोष, अरुंधती रॉय, सलमान रश्दी आणि पत्रकार पी साईनाथ यांचा समावेश आहे.
दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी उमर खालिद याला अटक केली होती. बेकायदा कृत्याविरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली होती. न्यायालयाने उमर खालिदला 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच दरम्यान उमर खालिदच्या सुटकेसाठी लेखक, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ यांचा एक गट पुढे सरसावला आहे. या गटाने सरकारला पत्र लिहून उमर खालिद याच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी उमर खालिद विरोधात केलेली कारवाई ही चुकीचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे.