लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक अर्ज पुण्यातून

पुणे : बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून राज्यात सर्वाधिक अर्ज आले आहेत. ही संख्या तब्बल २० लाख २३ हजार ४३६ इतकी आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीड लाख अर्ज करणाऱ्या महिलांचे बॅंक खाते आधारशी लिंक नसल्याचे दिसून आले. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता.
जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे यांनी या योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची आकडेवारीची माहिती दिली. या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन पोर्टलवरुन १० लाख ५६ हजार २५ महिलांनी अर्ज केले आहेत.
हेही वाचा – ‘वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं, आता..’; संजय राऊतांची सरकारवर टीका
तसेच, या पोर्टलवरुन अर्ज करताना अजूनही ९६ हजार ७१० जणांचे बॅंक खाते आधारकार्ड लिंक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आधारशी लिंक असलेल्या महिलांनाच प्राधान्याने योजनेची रक्कम तत्काळ बॅंक खात्यात जमा केली जात आहे.
दरम्यान, नारीशक्ती योजनादूत पोर्टलवरुनही ९ लाख ६८ हजार ४८४ जणांनी अर्ज केले आहेत. तसेच ५३ हजार ६७४ अर्ज आधारशी लिंक नाहीत. ही आकडेवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे. त्यामुळे अर्जाच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.