तुकाराम मुंढेंचा दणका, शटर ओढून काम करणाऱ्या खासगी कंपनीला थेट लाखाचा दंड

नागपूर | संचारबंदीच्या काळात शटर ओढून कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेणाऱ्या खासगी कंपनीला, नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. असा आदेश झुगारणाऱ्या दोन कंपन्यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दीड लाखांचा दंड ठोठावला.
शहरातील सर्व खासगी, कॉर्पोरेट आणि अन्य आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेले आहे. असे असतानाही वर्धमान नगर येथील ठवकर कंपनीतील सुमारे 60-70 कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते. कंपनीचे शटर बंद ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते. मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आणि उपद्रव शोध पथकाच्या चमूने या कंपनीवर धाड टाकली. तक्रारीनुसार तेथे सुमारे 60-70 कर्मचारी काम करताना आढळून आले. कोरोना संदर्भात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच, मनपाच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.





