‘चिंता नको, पुन्हा निवडणुका होणार नाहीत’, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचे वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा तर झालीच शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
‘आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचे काम करावे. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथे जाऊन नेत्यांनी आभार दौरे कराव,’ अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांना केल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचे चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, याची चर्चा जोर धरू लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत भाष्य केल्याची माहिती आहे. ‘आमदारांनी चिंता करू नये. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नाही,’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे.





