ग्राऊंडवर सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांसोबत रोखठोक चर्चा
मुंबई | “निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळ गेल्यानंतर 10-11 दिवसांनी सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणासाठी विविध मागण्या केल्या.
“चक्रीवादळानंतर 10-11 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप सरकारचं अस्तित्व काहीच दिसत नाही. वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. आता सरकारने तातडीची मदत देऊन कोकणाला उभं करण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“कोकण चक्रीवादळाच्या दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आलं, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. वादळग्रस्तांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे, विदारक चित्र उद्धवजींसमोर मांडलं. लोकांना तात्काळ रोख रक्कम मिळायला हवी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असे फडणवीस यांनी सांगितले.
कोकणात पत्र्यांचा काळा बाजार सुरु आहे. बोटींचं मोठं नुकसान झालं आहे, लॉकडाऊन आणि वादळांमुळे मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं. छोट्या दुकानदारांना मदत होणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला उभं करायला हवं, त्यांच्या कर्जावरील व्याज माफ द्यावं, अशीही मागणी फडणवीसांनी केली.





