केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/UMa-620x400-1.jpg)
भोपाळ | मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तराखंड दौऱ्या दरम्यान त्यांनी केदारनाथचे दर्शनही घेतले होते. केदारनाथचे दर्शन करतानाचा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला होता. कोरोना झाल्याचे त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. कोरोना झाल्यानंतर उमा भारती यांनी ऋषिकेश आणि हरिद्वारच्या दरम्यान वंदे मातरम कुंजमध्ये स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.
“मी केदारनाथ दर्शनानंतर प्रशासनाकडे आग्रह करत कोरोना चाचणी पथकाला बोलावले. कारण मला तीन दिवस ताप होता. मी हिमालयात सोशल डिस्टन्सिगसह सर्व नियमांचे पालन केले. पण तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे”, असं उमा भारती यांनी ट्वीट करत सांगितले.
“मी हरिद्वार आणि ऋषिकेषच्यामध्ये असलेल्या वंदे मातरम कुंजमध्ये क्वारंटाईन आहे. हे माझ्या कुटुंबासारखेच आहे. चार दिवसानंतर पुन्हा मी तपासणी करणार आहे आणि परिस्थिती अशीच असली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेऊ. माझ्या संपर्कात आलेल्या इतरांनी सावधानी बाळगा आणि आपली कोरोना चाचणी करा”, असं आवाहनही उमा भारती यांनी केलं आहे.