उपराजधानीत आता गुंडांना थारा नाही – गृहमंत्री
![Ambani case to become Home Minister? Anil Deshmukh's reaction after Sharad Pawar's meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/anil-deshmukh-scaled.jpg)
नागपूर | नागपुरला क्राइम फ्री सिटी करण्यासाठी गुंडांविरुद्ध पोलिसांनी फास आवळणे सुरु केले असताना आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुंडांची तक्रार करण्यासाठी शिबिराचे आयोजन केलं आहे. नागपुरात गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा थारा राहणार नाही असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय. नागपुरला नको असलेली क्राईम कॅपिटल ही ओळख मिळाली. नागपूरला लागलेला हा ठसा मिटविण्याचा प्रयत्न गृहमंत्री म्हणून मी करत आहे. नागपुरातल्या नामवंत गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
शहरात गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा थारा राहणार नाही असा इशाराही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी शहरातील 118 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत तर 51 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्यावर कारवाई करताना त्याने अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त करण्याचे कामसुद्धा शहर पोलिसांनी केले. याचप्रकारे गुंड साहिल सय्यदचे मानकापूर येथील आलिशान घर हे अवैध असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ त्यावर कारवाई करून तेसुद्धा पाडण्याचे काम केले आहे. यापूर्वी रोशन शेख, प्रीती दास, मंगेश कडव, तपण जयस्वाल व नार्कोटिक गॅंगस्टर आबू अण्णा यासारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे काम नागपूर पोलीस करीत आहेत. याबाबत गृहमंत्री स्वतः नागपूर शहराच्या गुन्हेगारी संबंधीचा आढावा घेत आहे.