‘उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा’, मायावतींची मागणी

लखनऊ – उत्तर प्रदेशातील हाथसर आणि बलरापूर येथे तरुणींवर बलात्कार झाल्याच्या निषेधार्थ देशभर संताप व्यक्त करण्यात येतोय. त्याचपार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला.
मायावती पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी किमान उत्तर प्रदेशाकडे तरी लक्ष द्यावे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही राज्यातील योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हाथरसपाठोपाठ बलरामपूर येथे झालेली घटना दुर्देवी असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पीडित मुलीचा एफआयआरही नोंदवला गेलेला नाही. अंत्यसंस्काराला घरच्या लोकांनाही जाऊ दिले नाही. हा प्रकार अत्यंत अमानुष असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यात लक्ष घालावे, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसकडे निघाले आहेत. त्यांना अडवण्यात आले असून पीडित कुटुंबीयांची भेट घेऊ दिली जात नाही. राष्ट्रीय नेत्यांना अशा पद्धतीनं रोखणं अत्यंत दुर्देवी आहे, अशी टीकाही त्यांनी केलं आहे.





