आज दुपारी दीड वाजता अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Uddhav-Thackeray-Balasaheb-Thorat-Ashok-Chavan.jpg)
मुंबई | महाविकास आघाडीच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. परंतु, त्यासाठी वेळ मिळत नव्हती. अखेर याभेटीसाठी मुहूर्त सापडला असून आज दुपारी दीड वाजता बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांचा आरोप आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक वर्ग तीनही पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं होते.
महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेस पक्षाने आपली नाराजी आता उघडपणे मांडली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, सरकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी केलं जात नाही. काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी बैठक घेणार होते. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ही बैठक पार पडणार होती, परंतु या बैठकीला काही योग आला नाही. आता मात्र या बैठकीला मुहूर्त सापडला असून आज दुपारी एक वाजता ही बैठक पार पडणार आहे.