अमेरिकेत ४ राज्यांत ७ इंचांपर्यंत बर्फवृष्टी, ८३ वर्षांचा विक्रम मोडीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Pasco.jpg)
एल पासो | अमेरिकेच्या मध्य व दक्षिणेकडील राज्यांत बर्फवृष्टी दुसऱ्या टप्प्यात आहे. इलिनॉय, ओक्लाहोमसह ४ राज्यांत भीषण बर्फवृष्टी झाली. सर्व प्रमुख महामार्गांवर बर्फच बर्फ साचला आहे. त्यामुळे वाहतूक रोखण्यात आली. मिसोरीमध्ये बर्फामुळे २० पेक्षा जास्त गाड्यांची टक्कर झाली. त्यात ५ लोक जखमी झाले.
टेक्सासच्या एल पासोमध्ये ४ इंच बर्फवृष्टी झाली. ओक्लाहोममध्ये ४.५ इंच बर्फ कोसळला. फेब्रुवारी २००३ मध्ये २.३ इंच बर्फवृष्टी झाली होती. उटाहच्या सॉल्ट लेक सिटीमध्ये तर ७.४ इंचांपर्यंत नोंद झाली आहे. या आधी ३ फेब्रुवारी १९३६ मध्ये ७ इंच बर्फ कोसळला हाेता. या राज्यांत तापमान उणे ५ अंशांहून कमी झाले होते. सामान्यपणे या दिवसांत थंडीचा एवढा कडाका नसतो.
डेनेव्हर, मिसोरी, एल पासोमध्ये बर्फवृष्टीमुळे १७६ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. ६०० हून जास्त विमानांची उड्डाणे विलंबाने झाली. पाऊस, वादळाची शक्यता : हवामान विभागाने आगामी चोवीस तासांत शिकागो, डेट्रॉयट, कोलंबिया व मिसोरीमध्ये हिमवादळाचा तडाखा बसू शकतो, असा इशारा दिला आहे. ओहियोमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मध्य व ईशान्येतील प्रदेशांत ताशी ९५ किमी वेगाच्या वाऱ्यासह वादळ धडकण्याची शक्यता आहे.