अलर्ट..! HMPVव्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

HMPV Virus | गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV Virus धुमाकूळ घालत आहे. अशातच नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. दोन लहान मुलं एचएमपीव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. एक ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. ३ जानेवारीलाच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे. हे एचएमपीव्हीचे राज्यातील पहिले दोन रुग्ण आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. मात्र, दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करुन घेण्याची गरज भासली नाही. या दोघांनाही घरीच उपचार देण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही मुलांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती आहे.
हेही वाचा – पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
अतिदक्षता म्हणून ‘या’ गोष्टी कराव्या :
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर व नाकावर रुमाल ठेवावा.
- सॅनिटायझरनं हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
‘या’ गोष्टी टाळा :
- खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं.
- टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा.
- वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
- आजारी लोकांपासून लांब राहावं.
- व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.





