अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई | राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे. अजून यावर अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे.
राष्ट्रपती राजवट नको म्हणून फडणवीस यांना पाठिंबा, असे अजित पवार यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट जास्त दिवस राहायला नको, अशी अजित पवार यांची भूमिका होती.
२३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते असताना अजित पवारांनी त्यांच्या आमदारांच्या भाजपच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना दिलं. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यात खळबळ माजली. यानंतर शरद पवार यांनीही ही अजित पवारांची वैयक्तिक भूमिका आहे, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांना गटनेतेपदावरून काढून टाकून त्यांच्याऐवजी जयंत पाटील यांचीही निवड केली.





