breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात उभारले जावे’; भाजपा आमदार राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | प्रतिनिधी 
भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ लता दीदी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अनेक अवयव निकामी (Multiple Organ Failure) झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दादरच्या शिवाजी पार्कात रविवारी संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्कवर त्याजागी लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारावे, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली.

भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली. ‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतरत्न स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे शिवाजी पार्कवर त्याच जागी गानकोकिळा लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्याच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात अशी मागणी संपूर्ण देशाचीच नव्हे तर जगातील कोट्यवधी संगीतप्रेमी अन लता दीदींच्या चाहत्यांची आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे’, अशी मागणी लतादीदींचा एक चाहता या नात्याने भाजपा आमदार राम कदन यांनी केली.

मराठी, हिंदीसह ३५ हून अधिक भाषांमध्ये लता दीदींनी अनेक गाणी गायली. सायंकाळी सातच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. हृदयनाथ मंगेशकरांचे सुपुत्र आदिनाथ यांनी त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते. तसेच, मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभूकुंज निवासस्थानीही सेलिब्रेटींनी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. महानायक अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे आदी लोक आले होते. याशिवाय शिवाजी पार्कवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांसह सर्व क्षेत्रांतील बडे सेलिब्रिटी हजर होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button