breaking-newsTOP Newsई- पेपरताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘ऑन दी स्पॉट’ : रुपीनगर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था; नगरसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष?

  • विकासकामांवर परिणाम : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रभाग वाटून घेतला?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत रुपीनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून, याकडे विद्यमान नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर काही ठिकाणी रस्त्यांवर ‘मलमपट्टी’ करण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे आणि पौर्णिमा सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यावेळी शहरात भाजपाची लाट असतानाही तळवडे गावठाण, एम.आय.डी.सी. आयटी. पार्क, ज्योतिबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती भाग, ताम्हाणे वस्ती आदी भागातील मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पसंती दिली. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या वाट्याला निराशा आल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


रुपीनगरमधील श्रीराम कॉलनी, रुपी सोसायटी आदी भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याबाबत वेळोवेळी नागरिकांनी मागणी करुनही नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत. भैरवनाथ सोसायटी येथील रस्त्याचे काम निवडणुकीच्या तोंडावर हाती घेतले. मात्र, रस्त्याची उंची जास्त असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची समस्या आहे. सांडपाणी आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्था सक्षम करणे अपेक्षीत आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याला मलमट्टी करण्यात येत आहे. परिणामी, नागरिकांना समस्यांचा आणखी सामना करावा लागणार आहे, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

तसेच, एकता चौक ते अचानक चौकातील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. खोदकाम केल्यानंतर काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे गैरसोय झाली असून, वाहतुकीला अडथळा ठरत आहे.
नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभागातील चारही नगरसेवकांनी आपल्या प्रभावानुसार प्रभागाची वाटणी केली आहे. याचा परिणाम विकासकामांवर होत असून, नागरिकांची गैरसोयही झाली आहे. चारपैकी तीन नगरसेवकांना महापालिका स्थायी समितीमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. तरीही प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यात अपयश आल्याचे दिसते. दुसरीकडे, नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे विशिष्ट एकाच भागातील विकासकामे हाती घेतली जातात, अशी चर्चा प्रभागात ऐकायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button