breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ऑनलाइन सातबारासाठी बँकांशी करार – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

  • ‘ई-पीक’ पाहणीची माहिती वायदे बाजारासाठी मौल्यवान

नगर |

सातबारा ऑनलाइन पद्धतीने काढण्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दीड कोटी लोकांनी ऑनलाइन दाखले मिळवले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सातबारासाठी त्रास होऊ नये यासाठी बँकांशी करार केला जाणार आहे. बँका व्यवहारासाठी सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकतील. याच पद्धतीने ई-पीक पाहणीच्या अभिनव उपक्रमातून सरकारकडे मोठी माहिती (डाटा) संकलित झाली आहे. त्याचा वायदे बाजारात मोठा उपयोग होऊ शकतो. हा मौल्यवान डाटा वायदे बाजारासाठी उपलब्ध करायचा की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. शहरात ५४ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज, बुधवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जलसंधारण मंत्री शंकराव गडाख, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. बबनराव पाचपुते, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, महापौर रोहिणी शेंडगे, पद्मश्री पोपटराव पवार व राहिबाई पोपेरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. महसूल विभागाचे कामकाज पारदर्शी व नागरिकांसाठी सुलभतेने व्हावे, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, अशी सूचना करुन थोरात म्हणाले की, सरकारचे यशापयश कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. नागरिकांना हेलपाटे मारावे लागल्यास ‘सरकार काही कामाचे नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त होते. जलसंधारण मंत्री गडाख यांनी महसूल यंत्रणेने गतीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली तर पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे भाषण करताना नवीन इमारत सुशोभित करावी तसेच तेथे स्वच्छता राखावी अशी सूचना केली. पोपटराव पवार यांनी आपल्या कामाला राजकीय पाठबळ मिळाल्यामुळेच पद्मश्री पदापर्यंत पोहोचता आले, अशी भावना व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले.

  • राष्ट्रवादीची अनुपस्थिती अन् राजकीय टिप्पणी

नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात अनेक राजकीय कांगोरे व्यक्त झाले. राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, पदाधिकारी कार्यक्रमास अनुपस्थित होते, त्याची चर्चा होत होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले जात होते, मात्र प्रत्यक्षात त्यांनी आधीच मुद्रित करून ठेवलेल्या ध्वनिचित्रफितीद्वारे संदेश दिला. नूतन इमारतीची पायाभरणी व उद्घाटनही महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते होत आहे, हा एक विलक्षण योगायोग असल्याचा उल्लेख करत मंत्री गडाख यांनी आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्यामागे जाऊ असे स्पष्ट केले. तोच धागा पकडत थोरात म्हणाले की, आमच्या मागे या असे आम्ही कधी म्हणालो नाही. आमच्याबरोबर या, आमच्या पुढे जा, आमची काही हरकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button