breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मामा-भांजेंना ‘दिल्लीचे वेध’ : शिरुर-मावळ लोकसभेसाठी लांडे-वाघेरे अन् लांडगे मैदानात

आमदार महेश लांडगे राजकीय केंद्रस्थानी; मावळातून संजोग वाघेरे, शिरुरमधून विलास लांडे तीव्र इच्छुक

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर घराणी सक्रीय झाली असून, शिरुर लोकसभा मतदार संघातून माजी आमदार विलास लांडे यांनी मैदानात उडी घेतली आहे. तर, मावळ लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कट्टर समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ‘शिव बंधन’ हातात बांधण्याची तयारी केली आहे. योगायोग म्हणजे लांडे आणि वाघेरे यांचे नात्याने भाचे लागणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचेसुद्धा शिरुरसाठी नाव चर्चेत आहे. त्यामुळे मामा- भांजेना आता ‘दिल्लीचे वेध’ लागले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे पाटील यांनी आज थेट मातोश्रीला भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे. वाघेरे यांच्या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आता ते नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पण महत्त्वाचे ठरणार आहे.

संजोग वाघेरे पाटील पिंपरी चिंचवड शहरातील शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व.. सुरुवातीपासून अजित पवार यांचे खंदे समर्थक असे त्यांची ओळख. नगरसेवक, महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मावळ लोकसभा मतदारसंघातून तीव्र इच्छुक आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत तिथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला तेथून उमेदवारी मिळणे याची शक्यता कमीच दिसत आहे. म्हणूनच संजोग वाघेरे पाटील यांनी आज थेट मातोश्री गाठत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.

हेही वाचा  –  Pimpri : माजी नगरसेवक सुरेश गदिया यांचे निधन

शिरूरमधून विलास लांडे यांनी दंड थोपाटले..

दुसरीकडे, शिरुर लोकसभा मतदार संघातून माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपाटले आहेत. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार आहे. २००९ मध्ये मी ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मी तयारी केली होती. २०१९ मध्येही मी पूर्ण ताकदीने तयारी केली होती. मात्र, त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी डॉ. अमोल कोल्हे यांना संधी दिली. आता महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आहेत. भोसरीत सुमारे साडेपाच लाख मतदार आहेत. त्यामुळे राजकारणापलिकडे जावून आणि एकत्र बसून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. केवळ अजित पवार यांनी संधी द्यावी, अशी इच्छा लांडे यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

शहराच्या राजकारणात महेश लांडगे केंद्रस्थानी..

पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण नाती-गोती, गावकी-भावकी भोवती फिरणारे आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर संजोग वाघेरे हे दोन्ही नेते आमदार महेश लांडगे यांचे नात्याने मामा लागतात. शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघात कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या तिकीटावर हे दोन्ही नेते मैदानात उतरणार आहेत. भोसरीत एकत्र बसून निर्णय घेवू.. महायुती म्हणून उमेदवारी मिळवू.. असा दावा लांडे यांनी केला आहे. तर, मावळ मतदार संघातील नात्या-गोत्यांचा फायदा वाघेरे यांना होणार आहे. कारण, मावळात लांडे-लांडगे यांचा मोठा जनसंपर्क आहे. विशेष म्हणजे, भाजपाकडून महेश लांडगे शिरुरचे उमेदवार होवू शकतात. त्यामुळे ‘महायुती’ आणि भोसरी मतदार संघात राजकारणापलिकडे जावून एकत्र बसून विचार करू…असा दावा लांडे यांनी केला आहे. परिणामी, शहराच्या राजकारणामध्ये महेश लांडगे पुन्हा एकदा केंद्रस्थानी पहायला मिळत आहेत.

मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहे. मागील निवडणूक देखील मी इच्छुक होतो. तशी तयारी देखील केली होती. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे प्रवेश केला नाही. उमेदवारी संदर्भात ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि मला कळवतील. त्यानंतर मी पुढील भूमिका स्पष्ट करेन.

संजोग वाघेरे, माजी महापौर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button