क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून पदकाची लूट!

योगासनात महाराष्ट्राला २ सुवर्ण, १ रौप्य तर २ कांस्यपदक : जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळे व आर्यन दवंडे यांची सोनेरी हॅट्ट्रिक

चेन्नई । हर्षल देशपांडे

महाराष्ट्र संघाने चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुसंडी मारताना पदकांची लयलूट केली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी योगासने, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, सायकलिंग या प्रकारांत तब्बल ११ पदके जिंकली. यामध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य तर ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

योगासनामध्ये महराष्ट्राच्या खेळाडूनी एकल सदरीकरण प्रकारात तब्बल ५ पदकांची कमाई केली. मुलांच्या गटात मुंबईच्या रोहन तायडेने सुवर्णपदकावर आपले कोरले. सन २०२३ साली झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत देखील रोहनने सुवर्णपदक मिळविले होते. मुंबई येथील बिल्वा योग शाळेत रोहन सराव करत असुन त्याने यापुर्वी राष्ट्रीय योगा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली आहे. रोहन सध्या मुंबई येथील सेंट जॉन युनिव्हर्सल शाळेत पाचवी मध्ये शिकत आहे.

मुलांच्या एकल सदरीकरण प्रकारात स्वराज फिसकेने कांस्य पदक मिळविले. भिवंडी मुंबईच्या राजाराम स्पोर्टस अकादमीमध्ये रुपेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे धडे गिरवत आहे. यापूर्वी झालेल्या दोन खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. त्यापैकी मध्य प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी बजावली होती.

मुलींच्या एकल सादरीकरणात महाराष्ट्राच्या मुलीनी सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तीनही पदके मिळविताना योगासनातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. संगमनेर, (अहमदनगर)च्या रुद्राक्षी भावेने चमकदार प्रात्याक्षिके करताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्यी रुद्राक्षी दहावीत शिकत असून ती विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व किरण वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. सुवर्ण पदक मिळाल्याने आनंद झाला आसल्याचे तिने बोलताना सांगितले.

नागपूर येथे संदेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या तेजस्विनी खिंचीने एकल सादरीकरणात रौप्य पदक मिळविले. तेजस्विनी नागपूरच्या सुयश कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी असून तिने आठव्या वर्गात शिक्षण घेत आहे. संगमनेरच्या प्रांजल वन्नाने या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी असणारी प्रांजल सुवर्णकन्या रुद्राक्षी सोबतच विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व किरण वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळे व आर्यन दवंडे यांची सोनेरी हॅट्ट्रिक

महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक्स या प्रकारात आज २ सुवर्णपदकांची कमाई केली. सकाळच्या सत्रात ठाण्याचा खेळाडू आर्यन दवंडे याने अपेक्षेप्रमाणे सोनेरी हॅट्ट्रिक साजरी केली. दुपारच्या सत्रात संयुक्ता काळे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्स मधील वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात लागोपाठ तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून हॅट्ट्रिक संपादन केली. संयुक्ता हिने याआधी झालेल्या दोन खेलो इंडिया स्पर्धांमध्ये वैयक्तिक सर्वसाधारण विभागात विजेतेपद मिळाले होते. आजही तिच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा होती. ही अपेक्षापूर्ती करताना तिने १०२.७५ गुणांची कमाई केली. आजही तिने सर्वच साधनांच्या साहाय्याने अप्रतिम कौशल्य दाखविले.

वयाच्या पाचव्या वर्षी जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षणास सुरुवात करणाऱ्या संयुक्ताने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सव्वाशे सुवर्णपदकांसह दीडशे पदकांची लयलूट केली आहे. ती ठाणे येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली फिओनिक्स अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. संयुक्ताने आजपर्यंत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेत आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने जगातील सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये तिला स्थान दिले आहे. महाराष्ट्राच्या परिना मदनपोत्रा हिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिने ८५.४० गुणांची नोंद केली. तिला चौथा क्रमांक मिळाला.

तलवारबाजीच्या स्पर्धेमध्ये लातूरच्या माहीचा सुवर्णवेध

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना लातूरच्या माही अरदवाद हिने तलवारबाजी मधील एपी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले. गतवर्षी तिला स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र तिने गतवर्षीच्या पराभवाची कसर दूर करीत नेत्रदीपक यश संपादन केले. माही ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजिंक्य दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला तीन पदके

सायकलिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूनी चमकदार कामगिरी करताना दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकली. मुलांच्या एक किलोमीटरच्या टाईम ट्रायल्स प्रकारात वेदांत जाधवने १ मिनिट १३.३६२ सेंकद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. मुलांच्या टीम स्प्रींट प्रकारात मंथन लाटे, वेदांत जाधव व वेदांत ताजणे या महाराष्ट्राच्या त्रिकुटाने १ मिनिट १०.४३४ सेंकद वेळेसह रौप्यपदकावर नाव कोरले. केरळच्या संघाने १ मिनिट ९.८५६ सेंकद वेळेसह सुवर्ण, तर यजमान तमिळनाडूच्या संघाने १ मिनिट ११.१५६ सेकंद वेळेसह कांस्यपदकाला गवसणी घातली. महिलांच्या ५०० मीटर्स टाईम ट्रायल्स प्रकारात महाराष्ट्राच्या पदकाची पाटी कोरी राहिली. मात्र, या शर्यतीतील टीम स्प्रींट प्रकारात महाराष्ट्राच्या स्नेहल माळी, शिया लालवाणी व सायली अरंडे या त्रिकुटाने १ मिनिट २०.८१४ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. यजमान तमिळनाडूने सुवर्ण, तर राजस्थानच्या संघाने रौप्यपदकाची कमाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button