breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टिंगमध्ये विक्रमी सुवर्ण; नेमबाजीतही सुवर्णवेध

महाराष्ट्राला शुक्रवारी दोन सुवर्ण, एक कांस्य

चेन्नई : महाराष्ट्राच्या मेघा आहिरे हिने वेटलिफ्टिंगमध्ये नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरून, तर ईशा टाकसाळे व पार्थ माने या मराठमोळ्या जोडीनेही नेमबाजीत मिश्र दुहेरीच्या १० मीटर एअर रायफल प्रकरात सुवर्णवेध साधत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस गाजविला. याचबरोबर वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारेने कांस्यपदक जिंकले.

शेतकऱ्याची पोर लई हुशार

शेतकऱ्याची पोर लई हुशार हे म्हणणे आज येथे खरे ठरले. मनमाड जवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंग मधील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. हे स्वप्न साकार करताना तिने क्लीन व जर्कमध्ये स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाली आहे. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले.

मेघा हिने या स्पर्धेतील स्नॅच या प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ६३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्क या प्रकारात ८५ किलो वजन असे एकूण १४८ किलो वजन उचलले. क्लीन व जर्क या प्रकारात तिने दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी महाराष्ट्राच्याच सौम्या दळवी हिने गत वेळी नोंदविलेला ८३ किलो या विक्रमाची बरोबरी केली. पाठोपाठ आंध्र प्रदेशच्या आर. भवानी हिने ८४ किलो वजन उचलून नवा उच्चांक नोंदविला. तथापि मेघाने शेवटच्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला.

मेघाचे वडील संतोष व आई इंदुबाई हे दोघेही शेतकरी असून आज येथे आपल्या लेकीचे स्वप्न साकार करताना साक्षीदार होते. मेघा हिने पदक स्वीकारल्यानंतर त्या दोघांना घट्ट मिठी मारली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले. मेघा हिची मोठी बहीण वीणा व भाऊ मुकुंद हे दोघेही आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत. या सर्व भावंडांच्या खुराकाची तसेच अभ्यासाची जबाबदारी त्यांची आई स्वतः सांभाळत असते. भावंडाकडून प्रेरणा घेत मेघाने वेटलिफ्टिंग मध्ये करिअर सुरू केले आहे.

हेही वाचा – ‘मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले’; हरिभाऊ राठोड यांचं विधान चर्चेत

मेघा ही मनमाड येथील छत्रे महाविद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहे. ती जय भवानी व्यायाम शाळा येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. मेघा व तिची भावंडे मनमाड येथेच राहून सराव करतात.

मेघा हिच्याच गटात आकांक्षा व्यवहारे ही देखील सहभागी झाली होती मात्र तिला पदकापासून वंचित राहावे लागले. एक आठवड्यापूर्वी ती अरुणाचल मध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. तेथे तिला कांस्यपदक मिळाले होते. तेथून येताना तिची खूपच दमछाक झाली होती त्यामुळे तिला येथील खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळवता आले नाही.‌

मुलांच्या गटात मात्र मनमाड चा खेळाडू कृष्णा व्यवहारे याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅच या प्रकारात ८३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये त्याने १०१ किलो असे एकूण १८४ किलो वजन उचलले. तो मनमाड येथील गुड शेफर्ड हायस्कूलमध्ये शिकत असून त्याचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. तो जय भवानी व्यायाम शाळा येथे त्याचे काका प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

नेमबाजीत ईशा-पार्थ जोडीचा अचूक निशाणा

चेन्नई येथे सुरु असलेल्या गुरुनानक महाविद्यालयच्या शूटिंग रेंजमध्ये हरियणा संघाचा १६-६ गुणांनी धुव्वा उडवीत महाराष्ट्राच्या ईशा- पार्थने पदकाची बाजी मारली. अंतिम लढतीत हरियाणा संघाच्या दिशा धनकर व अर्षित अरोरा यांनी सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. ६व्या फेरीत ईशा-पार्थ यांनी प्रत्येक शॉट अचूक मारताना सहा वेळा २ गुणांची कामाई करताना विजय सकाराला.

ईशा आणि पार्थ या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धामध्ये दमदार कामागिरी केली आहे. महाराष्ट्राचे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरूर यांच्या मुंबईतील लक्ष्य अकादमीत सराव करतात.

अमरावतीमध्ये सहाव्या वर्षापासून खेळाचा श्री गणेशा करणाऱ्या ईशाने चार आंतरराष्ट्रीय पदके जिंकली असून युवा स्पर्धेत तिने विक्रमाची नोंद केली आहे. ईशाने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडियात पदकाचा करिश्मा घडविला. पार्थने प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातली. २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हे खेलो इंडियातील यश उर्जा देणारे असल्याचे ईशाने सांगितले.

पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालय क्रीडा विभाग कक्ष अधिकारी रणसिंह डेरे, पथक प्रमुख विजय संतान, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, संजय शेलार, जागतिक विजेते नवनाथ फरताडे, विश्वजीत शिंदे, संदीप तरटे, अजित पाटील, नेहा साप्तेसह दोन्ही खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button