breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

चोरट्यांवर ‘करडी नजर’ ; पोलीस प्रशासन सतर्क : गस्ती पथके नियुक्त करणार

पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दिवाळीच्या सुट्यांमध्ये एमआयडीसीत चोरी व गुन्हेगारीचे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी पोलिसांची विशेष गस्ती पथके नियुक्त करण्यात येणार आहेत, तसेच उद्योजकांचीही त्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

दिवाळीनिमित्त औद्योगिक आस्थापनांकडून सुटी जाहीर केले जाते. त्यानुसार यंदा २२ ते २७ आक्टोबर या कालावधीत कंपन्यांमधील कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीत चोरी व गुन्हेगारीचे प्रकार घडतात. कंपन्यांमधून स्क्रॅप, मशीन, कच्चा माल, वाहने तसेच इतर साहित्य, वस्तू चोरून नेल्या जातात. त्यामुळे कंपन्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

सुटीच्या कालावधीत एमआयडीसीतील सुरक्षेसाठी उद्योजकांची मदत घेण्यात येणार आहे. गस्तीसाठी कंपन्यांकडून वाहने, खासगी सुरक्षारक्षक घेण्यात येणार आहेत. तसेच पोलीस मित्र, स्वयंसेवक यांचाही या पथकांमध्ये समावेश राहणार आहे. उद्योजकांनी कंपन्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सुरक्षारक्षकदेखील नियुक्त करावेत. सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीसह ‘अलार्म बसवणे, अशा सूचना उद्योजकांना करण्यात येत आहेत.

पिंपरी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, तळवडे, चाकण, तळेगाव येथील उद्योजकांशी पोलिसांकडून संवाद साधण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त बैठक घेणार आहेत. विभागानुसार या बैठका होणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दोन परिमंडळ आहेत. एका परिमंडळात गस्तीसाठी चार पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. या प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि चार कर्मचारी, असे पाच पोलीस राहणार आहेत.

दिवाळीच्या सुटीमध्ये एमआयडीसीत शुकशुकाट असतो. त्याचा गैरफायदा घेत चोरी, गुन्हेगारी कृत्य केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयडीसीत रात्री आणि दिवसाही गस्त घालण्यात येणार आहे. यासाठी विशेष पथके राहणार आहेत. उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, अडचणी समजून घेण्यात येऊन त्यांच्या मदतीने आणखी उपाययोजना करण्यात येतील.
– अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button