ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट जवळ..!

जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या कळवा भागात महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवारांनी जाती-पातीचं राजकारण आणि फोडाफोडाचं राजकारण केल्याची टीका भाषणात केली. शिवसेना आणि धनुष्य बाण असलेल्या चिन्हाच्या पोडियमवरुन राज ठाकरेंनी १८ वर्षांनी भाषण केलं. त्यामुळे हे भाषण चर्चेत आलं आहे. अशात राज ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांनी खडे बोल सुनावले आहेत. राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट जवळ आला आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

भाषणात काय म्हणाले होते राज ठाकरे?
“ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी फोडला, काँग्रेस, १९७८ ला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, तेव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते? तेव्हा का नाही काही बोलले? बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा करणाऱ्या आणि त्यांचे हात लटपटत आहे असं म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षात घेता तेव्हा लाज नाही वाटली? ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, त्या छगन भुजबळांसह मंत्रिमंडळात बसताना लाज नाही वाटली? का नाही तेव्हा विरोध केला?” असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची टीका
“राज ठाकरेंनी कळव्यात येऊन भाषण केलं. महायुतीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणला का? किंवा काही खास बोलले का? ज्या विषयांवर ते कायमच बोलत आले आहेत तेच विषय कळव्यातल्या भाषणातही होते. म्हणून त्यांची एकही जागा निवडून येत नाही. राज ठाकरे काय बोलतात? मुस्लिमांना सरळ केलं पाहिजे, परप्रांतीयांना सरळ केलं पाहिजे इतकंच बोलतात. त्यांना कुणीतरी सुपारी दिली आहे का? शिवसेनेच्या दोन्ही जागा पडतील असं बघ रे. हिंदू-मुस्लिम, परप्रांतीय विरुद्ध मराठी अशी भांडणंच करत बसायची का महाराष्ट्रात?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना विचारले प्रश्न
“देशाची आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलचे दर, जगात भारताचा निर्देशांक कुठे गेला आहे? श्रीमंत कोण झाले आहेत, गरीब कोण आहेत? किती लोकांच्या हातात भारतातली संपत्ती आहे? त्यावर राज ठाकरे कधी बोलणार? शेती, उद्योग यावर राज ठाकरे कधी बोलणार? मुस्लिम आणि परप्रांतीय एवढेच मुद्दे आहेत का? मराठी पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत यावर बोलणार का? मुंबईतली मुख्यालयं दिल्ली आणि गुजरातला हलवली आहेत त्याबद्दल ते शांत का? “

राज ठाकरेंचं राजकारण शेवटाच्या जवळ
दोनच विषय घेऊन राज ठाकरे अनेक वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. जे विषय घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या राजकारणाचा शेवटच मला दिसतो आहे. आग लावण्याची कामं बंद करा, समाज मूर्ख राहिलेला नाही. लोकांनाही सगळं समजतं. परप्रांतीय आणि मुस्लिम यांना टार्गेट करुन हिंदू मतं मिळतील असं वाटत असेल तर तसं ते होत नाही हे राज ठाकरेंनी लक्षात ठेवावं असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button