breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : चेन्नईचा केकेआरवर धडाकेबाज विजय:मराठमोळ्या ऋतुराजचे अर्धशतक

अबुधाबी – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सहा विकेट्स राखून मोठा विजय साकारला. अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाना धमाकेदार फटकेबाजी करत चेन्नईसाठी विजय खेचून आणला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यातही धडाकेबाज अर्धशतक साकारले. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. कालच्या सामन्यात त्याने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

सामन्याच्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना दीपक चहरच्या पहिल्याच षटकांत शुभमन गिल आणि नितेश राणाच्या तीन चौकारच्या जोरावर १३ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या तीन षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. शुभमन गिल आणि नितीश राणानेदेखील सावध खेळी करत धावा करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ६ षटकांत केकेआरने ४८ धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलने २४ धावा आणि नितीश राणाने २४ धावा केल्या. त्यानंतर आठव्या षटकांत कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर शुभमन गिल बाद झाला. शुभमन गिलने ४ चौकारच्या जोरावर २६ धावा केल्या. शुभमन गिल बाद झाल्यानंतर केकेआरचा आक्रमक फलंदाज सुनील नरीन फलंदाजीसाठी आला. मात्र सुनील नरीनलाही धावा करण्यात यश आले नाही. मिशेल सँटनरच्या गोलंदाजीसमोर ७ धावा करत सुनील नरीन झेलबाद झाला. सुनील नरीन बाद झाल्यानंतर नितीश राणाला साथ देण्यासाठी रिंकु सिंग फलंदाजीसाठी आला. रिंकू सिंगचा या हंगामातील हा पहिलाच सामना होता. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली वापसी करत केकेआरच्या धावा रोखण्यात यश मिळवले. केकेआरला १२ षटकांत ८६ धावांवरच मजल मारती आली. त्यानंतर तेराव्या षटकांत रिंकू सिंग रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीसमोर झेलबाद झाला. रिंकू सिंगने ११ धावा केल्या.

केकेआरच्या १७३ धावांचा पाठाग करताना चेन्नईच्या संघाने चांगली सुरुवात केली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने यावेळी संथ सुरुवात केली. मात्र स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने मुक्तपणे फटकेबाजी करून चाहत्यांना खुश केले. चेन्नईचा दुसरा सलामीवीर शेन वॉटसनला मात्र यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसनला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले. वॉटसन बाद होण्यापूर्वी चेन्नईने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर अंबाती रायुडू फलंदाजीला आला. यावेळी ऋतुराज आणि रायुडूची जोडी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली. या जोडीने केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजने यावेळी ३७ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. ऋतुराजचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. मागील सामन्यात आरसीबीबरोबर ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज आणि रायुडूने यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात रायुडू यावेळी बाद झाला, त्याला केकेआरच्या पॅट कमिन्सने बाद केले. रायुडूने फक्त २० चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. रायुडू बाद झाल्यावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. गेल्या सामन्यात ऋतुराज आणि धोनीने विजयावर शिक्कामोर्तब केले होते. परंतु या सामन्यात मात्र धोनीला ऋतुराजला चांगली साथ देता आली नाही. धोनीला यावेळी केकेआरच्या चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. धोनीला यावेळी फक्त एकच धाव करता आली. धोनी बाद झाल्यानंतर सॅम कुरन फलंदाजीसाठी आला होता. एका बाजूला ऋतुराज गायकवाड आक्रमक खेळी खेळत होता. तर दूसरीकडे सॅम कुरनही त्याला चांगली साथ देत होता. मात्र १८व्या षटकांत पॅल कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर मोक्याच्या क्षणी ऋतुराज गायकवाड बाद झाला. यानंतर १६ चेंडूत ३३ धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा फलंदाजीसाठी आला. जाडेजाने १९ षटकांत आक्रमक फलंदाजी करत २० धावा पटकावल्या. त्यामुळे २०व्या षटकांत म्हणजेच शेवटच्या षटकांत चेन्नईला १० धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या षटकांत केकेआरचा गोलंदाज कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाच्या तडाखेदार फलंदाजीमुळे चेन्नईने केकेआरला ६ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे आता केकेआरचा प्लेऑफसाठीचा मार्ग खडतर झाला असून मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफचे स्थान पक्के झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button