breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मिठीबाई’च्या प्राचार्याविरोधात लैंगिक छळाचा आणखी एक गुन्हा

विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांच्याविरोधात आणखी एका महिलेने लैंगिक छळ व असभ्य वर्तनाबद्दल पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार जुहू पोलीस ठाण्यात हांडे यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा हांडे यांनी केला आहे.

सोमय्या महाविद्यालयात हांडे प्राचार्य असताना २००७ मध्ये एका प्राध्यापिकेने हांडे यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार व्यवस्थापन, महिला आयोग, मुंबई विद्यापीठ, पोलीस व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे केली होती. त्या प्रकरणात त्या महिलेला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तब्बल दहा वर्षे ती महिला आपल्यावरील अन्यायाविरोधात संघर्ष करीत होती. अखेर पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर, राज्य शासनाच्या व पोलिसांच्या स्तरावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. त्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टिळकनगर पोलीस ठाण्यात हांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली. परंतु पुढे काहीच कारवाई झाली नाही, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. हांडे यांनी त्या वेळीही आरोप फेटाळून लावले होते.

सोमय्या महाविद्यालयानंतर डॉ. राजपाल हांडे मिठीबाई महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दाखल झाले. आता तेथील एक प्रकरण उघडकीस आले आहे. मानसशास्त्रासंबंधात काम करणाऱ्या एका संस्थेशी संबंधित असलेल्या एका तज्ज्ञ महिलेने हांडे यांच्या असभ्य वर्तनाबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये मानसशास्त्राशी संबंधित संस्थेची वार्षिक सभा मिठीबाई महाविद्यालयात घेण्याचे ठरले होते. त्यासंबंधातील नियोजन करण्यासाठी २० ऑक्टोबरला महाविद्यालयात बैठक आयोजित केली होती. संबंधित महिला त्या बैठकीला उपस्थित होती. अन्य प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारीही आणि प्राचार्य म्हणून हांडे हेही हजर होते. बैठकीनंतर जेवणाच्या वेळी जबरदस्तीने हात धरणे, एकसारखे बघत राहणे, अशा प्रकारे हांडे यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याची त्या महिलेची तक्रार आहे. जेवणाच्या वेळीही संस्थेच्या एका वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या महिलेबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल फिजूल चर्चा हांडे करीत होते, त्यांचे वर्तन असभ्य होते, असे त्या महिलेचे म्हणणे आहे.

हांडे यांच्या अशा प्रकारच्या वर्तनाने अस्वस्थ झालेल्या त्या महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही याबाबत कळविले. त्याची संस्थेनेही गंभीर दखल घेतली आणि मिठीबाई महाविद्यालयात संस्थेची वार्षिक सभा घ्यायची नाही, असा निर्णय घेतला. तसे पत्र त्यांनी महाविद्यालयाला पाठविले. त्याचबरोबर झाल्या प्रकाराची सविस्तर लेखी माहिती व्यवस्थापनाला देऊन हांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर व्यवस्थापनाने तसे आश्वासनही दिले. परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे त्या महिलेने जानेवारी २०१९ मध्ये जूहू पोलीस ठाण्यात हांडे यांच्याविरोधात लेखी तक्रार केली. त्यावर प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी हांडे यांच्याविरोधात लैंगिक छळ व महिलेशी असभ्य वर्तनाबद्दल गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असल्याचे जुहू पोलीस ठाण्याकडून संबंधित महिलेला १० मे रोजी पत्राने कळविण्यात आले आहे.

हा मोठय़ा षड्यंत्राचा भाग

माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा मोठय़ा षड्यंत्राचा भाग आहे. माझ्याविरोधात केलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. आता नवीन कुलगुरू नियुक्त झाले. त्यासाठी १४ एप्रिल २०१८ ला मुलाखत झाली, त्या वेळी स्पर्धेत मी पुढे होतो. नंतर माझे नाव काढण्यात आले. आधीच्या महिलेने व या महिलेने संगनमताने माझ्याविरोधात कारस्थान चालवलेले आहे. माझ्याविरोधातील हा फार मोठा कटाचा भाग आहे.    – डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button