breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ENG vs IND Test: भारत-इंग्लंड कसोटी मालिका : लीड्सवर लोटांगण!

  • भारताचा पहिला डाव ७८ धावांत संपुष्टात; इंग्लंड बिनबाद १२० धावा

लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत संस्मरणीय विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड संघापुढे सपशेल लोटांगण घातले. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आघाडीच्या फळीला निष्प्रभ केल्यानंतर अन्य तीन तिघांनी भेदक मारा करीत भारताचा पहिला डाव फक्त ७८ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी दिवसअखेर बिनबाद १२० धावांपर्यंत पहिल्या डावात मजल मारून ४२ धावांची आघाडी घेतली.

अँडरसन (३/६), क्रेग ओव्हर्टन (३/१४), ऑली रॉबिन्सन (२/१६) आणि सॅम करन (२/२७) या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात खेळपट्टीवर स्थिरावूच दिले नाही. गेल्या नऊ महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय संघ १००हून कमी धावसंख्येवर गारद झाला. गतवर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा डाव ३६ धावांत आटोपला होता.

नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाही. भारताकडून सर्वाधिक ३५ धावांची भागीदारी मुंबईकर रोहित-रहाणे या जोडीने चौथ्या गड्यासाठी केली. रोहितने संयमी भूमिका घेत १७२ मिनिटे आणि १०५ चेंडू किल्ला लढवला.

३९ वर्षीय अँडरसनने आघाडीच्या तीन फलंदाजांना झटपट तंबूची वाट दाखवल्यामुळे उपाहाराप्रसंगी भारताची ४ बाद ५६ अशी अवस्था झाली होती. अँडरसनच्या गोलंदाजीचे ८-५-६-३ असे भेदक पृथक्करण होते. के. एल. राहुल (०), चेतेश्वर पुजारा (१) आणि विराट कोहली (७) या महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने यष्टीरक्षक जोस बटलरद्वारे झेलबाद केले. रहाणे स्थिरावतो असे वाटत असतानाच रॉबिन्सनने उजव्या यष्टीबाहेरील चेंडूवर त्याला बटलरद्वारे झेलबाद केले.

मग दुसऱ्या सत्रात १२ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात भारताचे उर्वरित सहा फलंदाज तंबूत परतले. उपाहारानंतर रॉबिन्सनने ऋषभ पंतचा (२) अडसर दूर केला, तर ओव्हर्टनने रोहितला बाद करण्याची किमया साधली. ओव्हर्टनने पुढच्याच चेंडूवर लॉर्ड्सवर झुंजार फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीला भोपळाही फोडू दिला नाही. पुढच्या षटकात करनने रवींद्र जडेजा (४) आणि जसप्रित बुमरा (०) यांना पायचीत केले. इशांत शर्मा (नाबाद ८) आणि मोहम्मद सिराज (३) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ओव्हर्टनने सिराजला बाद करून भारतीय धावसंख्येपुढे पूर्णविराम दिला.

त्यानंतर, उर्वरित अर्ध्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या सलामीवीरांनी वर्चस्व गाजवत नाबाद अर्धशतके झळकावली. लॉर्ड्सवर पराक्रम दाखवणारी भारताची वेगवान चौकडी बळी मिळवण्यासाठी झगडताना आढळली. त्यामुळे इंग्लंडचा संघ गुरुवारी पहिल्या डावात कितपत मजल मारेल, याची उत्सुकता आहे.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ४०.४ षटकांत सर्व बाद ७८ (रोहित शर्मा १९, अजिंक्य रहाणे १८; जेम्स अँडरसन ३/६, क्रेग ओव्हर्टन ३/१४, ऑली रॉबिन्सन २/१६, सॅम करन २/२७)

’ इंग्लंड (पहिला डाव) : ४२ षटकांत बिनबाद १२० (रॉरी बन्र्स खेळत आहे ५२, हसीब हमीद खेळत आहे ६०)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button