breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 81 नवे कोरोना रुग्ण, तर 145 ओमायक्रॉनबाधित

नवी दिल्ली | प्रतिनिधी 
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव सध्या सुरुच आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननंही डोकं वर काढलं आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावात मात्र काहीशी घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ओमायक्रॉनच्या व्हेरियंटची लागण झालेले 145 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती…

आतापर्यंत 4 लाख 77 हजार 422 रुग्णांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजार 913 वर पोहोचली आहे. अशातच महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 77 हजार 422 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 7469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 78 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत 137 कोटींहून अधिक डोस देण्यात आले

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरसवरील लसीच्या डोसची संख्या 137 कोटी इतकी झाली आहे. काल (शनिवारी) 76 लाख 54 हजार 466 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कोरोना लसीचे 137 कोटी 46 लाख 13 हजार 252 डोस देण्यात आले आहेत.

देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) ची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत एकूण 145 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची राज्यांनुसार आकडेवारी

महाराष्ट्र 48
दिल्ली 22
तेलंगणा 20
राजस्थान 17
कर्नाटक 14
केरळ 11
गुजरात 07
उत्तर प्रदेश 02
आंध्रप्रदेश 01
चंदिगढ 01
तामिळनाडू 01
पश्चिम बंगाल 01

राज्यात ओमायक्रॉनचे 48 रुग्ण

राज्यात शनिवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही 48 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या आठ रुग्णांपैकी साताऱ्यात तीन, मुंबई विमानतळावरील सर्वेक्षणात चार तर पुण्यात एक रुग्ण सापडले आहेत. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण 48 रुग्णांपैकी मुंबई येथे 18, पिंपरी चिंचवड येथे 10, पुणे ग्रामीण येथे 6, पुणे मनपा क्षेत्रात 3 कल्याण डोंबिवली येथे 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1, नागपूर 1, लातूर 1 आणि वसई विरार येथे 1 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 28 रुग्णाांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button