breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुवर्ण मंदिरात ग्रंथ साहिबची विटंबना; भाविकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

अमृतसर – पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने रेलिंगवरून उडी मारून गुरु ग्रंथ साहिब येथील पावित्र्य भंग करणारी कृती केल्यानंतर सुवर्ण मंदिरातील उपस्थित भाविकांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात या जमावाने त्या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अमृतसरचे पोलीस उपायुक्त परमिंदरसिंग भंडाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुवर्ण मंदिरात सायंकाळी ‘रेहरास साहिब’ पाठ सुरू असतानाच हा प्रकार घडला. एक अज्ञात तरुण डोक्याला पिवळा फेटा बांधून रांगेत दर्शनासाठी उभा होता. गाभाऱ्यात पोहोचेपर्यंत त्याची कुठलीच हालचाल संशयास्पद वाटली नाही. परंतु सर्व भाविक रांगेने दर्शन घेत असताना त्याचा नंबर येताच त्याने रेलिंगवरून उडी मारून थेट गाभाऱ्यात प्रवेश केला आणि गुरू ग्रंथ साहिबची विटंबना करत पवित्र कृपाण उचलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या व्यक्तीला तिथे उपस्थित शीरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी सदस्यांनी पकडले व बाहेर नेले. तिथे जमावाने त्याला बेदम मारहाण केली असता त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तो एकटाच सुवर्ण मंदिरात आला होता, असे प्रथमदर्शनी दिसत असून तरुणाची ओळख पटवणारे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, शीरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे कार्यकारी सदस्य भाई गुरप्रीतसिंह रंधावा यांनी श्री अमृतसर साहिब येथे घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या घटनेची तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पंजाब सरकारकडे केली आहे. तर भाजपा नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरबार साहिब येथील पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही दु:खद घटना आहे. याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझी चर्चा झाली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सिरसा यांनी सांगितले. गृहमंत्री याबाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button