breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

परभणीमध्ये प्रसूतीच्या कळा सोसणाऱ्या विवाहितेचा तराफावरून नदीतून प्रवास

  • मानवत तालुक्यातील नीलवर्ण टाकळी गावातील घटना

परभणी |

अतिवृष्टीच्या काळात नदीकाठच्या अनेक गावांचे रस्त्याचे प्रश्न गंभीर बनत चालले असताना प्रसूतीच्या कळा सोसणाऱ्या एका गरोदर महिलेला चक्क थर्माकोलच्या तराफ्यावरून पैलतीरी न्यावे लागले. नातेवाईकांनी शर्थीचे परिश्रम करून या महिलेला रुग्णालयापर्यंत आणल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. अक्षरश: जिवावर बेतणारा हा थरार या महिलेने अनुभवला. यानिमित्ताने नदीकाठच्या गावांच्या रस्त्याचे प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षांने समोर आले आहेत. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथे माहेरी आलेल्या २२ वर्षीय गरोदर विवाहितेला पुराच्या पाण्यातून थर्माकोलच्या तराफ्यावरून जीव धोक्यात घालत नदी पार करून रुग्णालयात नेण्यात आले. महिला वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने तिची सुखरूप प्रसूती झाली आहे. याबाबतची एक चित्रफीत समोर आल्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

बीड जिल्ह्यतील माजलगाव येथील रहिवासी शिवकन्या अंगद लिंबुरे ही २२ वर्षीय विवाहिता बाळंतपणासाठी माहेरी मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथे आलेली होती. दोन—तीन दिवसापासून तिच्या पोटात दुखू लागले होते. परंतु बोरी नदीला पूर आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाले होते. साहजिकच गरोदर विवाहितेला घेऊन तिच्या कुटुंबाला नदी ओलांडून जाणे शक्य झाले नाही. बोरी नदीला जास्त पाणी असल्याने तिला दवाखान्यात नेता आले नाही. तर, डॉक्टरांनाही गावात येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तिच्या पोटात कळा येवून तिला अस्वस्थ वाटू लागले, अशातच तिची प्रकृती बिघडू नये म्हणून भाऊ उमेश उत्तम कटारे, राहुल कटारे व इतर नातेवाईकांनी महिलेला नदी काठावर आणून गावकऱ्यांच्या मदतीने धाडस केले. नाइलाजाने तिला थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून नदी ओलांडून मानवत येथे ग्रामीण दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले. माहेरी आलेल्या लेकीच्या सुखरूप बाळंतपणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून, चार-पाच जणांच्या सहायाने टायरच्या टय़ूब व इतर वस्तूच्या आधाराने नदी पार करीत मानवतचे रुग्णालय गाठले.  डॉक्टरांनी तपासले व दाखल करून उपचार सुरू केल्यावर काही वेळातच त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मानवत, सोनपेठ या तालुक्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे प्रकर्षांने जाणवत असून या भागातील वृद्ध महिलांना अक्षरश: प्राणाची जोखीम पत्करावी लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button