ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोव्यातील कंपनीकडून अक्कलकोटच्या ठेवीदारांना लाखोंचा गंडा

चौघाजणांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : अवघ्या सहा महिन्यांत दामदुप्पट परतावा देण्यासह इतर आकर्षक बक्षिसे देण्याचे आमीष दाखवून गोव्यातील एका कंपनीने अक्कलकोटमध्ये अनेक मध्यमवर्गीयांकडून लाखोंच्या ठेवी गोळा केल्या. नंतर सर्व ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंदर्भात ठेवीदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोव्यातील दी युनायटेड ग्रुप आॕफ कंपनीच्या दोघा संचालकांसह चौघाजणांविरूध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मनोज शिवराज वाले (वय ४२, रा. समर्थनगर, अक्कलकोट) या शेतक-याने दिलेल्या फिर्यादीनुसार ३० डिसेंबर २०२३ ते २१ जानेवारी २०१४ या कालावधीत अक्कलकोटमध्ये एका हाॕटेलात हा फसवणुकीचा प्रकार घडला. मनोज वाले यांना हन्नूर (ता. अक्कलकोट) येथील प्रियांका शिवानंद पाटील या ठेवीदाराकडून दी युनायटेड ग्रुप आॕफ कंपनीच्या ठेव योजनेची माहिती मिळाली होती. कंपनीची माहिती घेण्यासाठी इच्छूक ठेवीदारांना गोव्यात येण्या-जाण्याच्या प्रवासासह तेथील हाॕटेलातील मुक्कामाचा खर्च कंपनी करणार आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर सहा महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्यासह ठेवीच्या रकमेवर दररोज एक टक्का परतावा मिळेल, ओळखीच्या व्यक्तींना या योजनेत सहभागी करून घेतल्यास १५ किलो सोने, महागड्या मोटारीपासून १५० बुलेट गाड्या बक्षिसापोटी देण्याचे कंपनीने दाखविले होते. नंतर अक्कलकोटमध्ये एका हाॕटेलात कंपनीने स्नेहमेळावा आयोजित करून शेकडो मध्यमवर्गीयांना ठेव योजनेची भुरळ घातली होती.

त्यानुसार मनोज वाले यांनी दोन लाख ४२ हजार १०० रूपयांची ठेवीस्वरूपात कंपनीत गुंतवणूक केली होती. तसेच प्रियांका शिवानंद पाटील, महादेव कळकप्पा हेगडे, जयश्री विश्वनाथ भरमशेट्टी व इतर अनेकांनी लाखो रूपयांची गुंतवणूक केली होती. परंतु अखेर यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेवीदारांना धक्का बसला. कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक सलीम प्रकाश गौस व संचालिका प्रतीक्षा दशरथ मोठे (दोघे रा. गोवा) तसेच कंपनीचा ट्रेनर इंद्रजित माने व आनंद रामचंद्र टोणे (रा. फलटण, जि. सातारा) हे आरोपी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button