breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदार संघात ‘राष्ट्रवादी पुन्हा’… विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे जोरदार ‘ब्रँडिंग’!

स्वातंत्र्य दिन अन्‌ वाढदिवसानिमित्त लक्षवेधी बॅनरबाजी
प्रभागनिहाय पदाधिकारी- कार्यकर्त्यांची एकजूट बांधली
पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये जोरदार ‘ब्रँडिंग’ केले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि वाढदिवसाचे निमित्त साधून काटे यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी पुन्हा’ च्या तयारीसाठी नाना काटे लागले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उच्चभ्रू आणि सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पिंपळे सौदागरमधून प्रतिनिधीत्व करीत आहेत. विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे मोठे बंधू शंकर काटे हे १९९७ ते २००२ पर्यंत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. काँग्रेसचे नेते स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेत आली. २००५ पासून विठ्ठल काटे राष्ट्रवादीत सक्रिय झाले. २००७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काटे यांनी पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये काटे यांनी बाजी मारली होती. पिंपळे सौदागरमधून मोठ्या फरकाने नाना काटे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यावेळी पिंपळे सौदागरमध्ये प्रशस्त रस्तेही उपलब्ध नव्हते. महापालिकेत संधी मिळाल्यानंतर पिंपळे सौदागरमध्ये विकासकामे सुरू केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी मदती झाली. उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील नागरिकांना राहण्यासाठी प्रशस्त परिसर करण्याच्या हेतूने विविध कामे मार्गी लावण्यात यश मिळाले. बांधकाम व्यावसायिकांना ‘रेड कार्पेट’ दिले. विकास आराखड्यानुसार रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या. २००७ ते २०१२ पर्यंत नगरसेवक असताना सुमारे ११० कोटी रुपयांची विकासकामे आम्ही पिंपळे सौदागरमध्ये करण्यात आली.

एकाचवेळी नगरसेवक असणारे एकमेव दांम्पत्य…

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच वेळी नगरसेवक म्हणून सभागृहात प्रतिनिधीत्व करणारे दांम्पत्य म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे आणि शितल काटे कार्यरत आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने बाजी शितल काटे मारली होती. विकासकामांचा धडाका कायम ठेवल्यामुळे २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये पुन्हा एकदा सुमारे ५ हजार मतांच्या फरकांनी काटे दांम्पत्याने बाजी मारली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पती-पत्नी एकाचवेळी नगरसेवक असल्याचा बहुमान काटे दांम्पत्याला मिळतो.
२०२४ साठी महाविकास आघाडीचा सक्षम चेहरा…

विरोधी पक्षनेता म्हणून नाना काटे यांनी महापालिकेत संयमाने पक्षाची बाजू मांडली. २०१४ मध्ये प्रचंड मोदी लाटेत पक्षाच्या तिकीटावर चिंचवड विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याना पराभवाचा समाना करावा लागला. त्यावेळी भाजपाचे दिग्गज नेते आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात उमेदवारी लढवण्याचे धाडस काटे यांनी दाखवले होते. महापालिकेतील कामकाजाचा सुमारे १५ वर्षांचा अनुभव, मोठा जनसंपर्क याच्या जोरावर आगामी २०२४ मध्ये नाना काटे महाविकास आघाडीचा सक्षम चेहरा ठरणार आहेत. पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रू प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नाना काटे सुशिक्षित लोकांची नाळ ओळखली आहे.

२०१४ पासून मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पडत्या काळात नाना काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. माजी- माजी नगरसेवक आणि आमदार पक्ष सोडून भाजपात दाखल झालेले असताना नाना काटे यांनी संयमाने राष्ट्रवादीचे अस्थित्त्व सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर प्रभागात टिकवून ठेवले. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी जबाबदारी नाना काटे यांना मिळण्याची शक्यता आहे.

चिंचवडमध्ये हनुमंत गावडे गट सक्रिय…

स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे यांचा गट चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये सक्रीय झाला आहे. कबड्डीमध्ये नामांकीत क्रीडापटू असलेले आणि छत्रपती पुरस्कार शंकर काटे आणि हनुमंत गावडे हे प्रा. मोरे सरांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाना काटे आणि अन्य १० ते १२ आजी-माजी नगरसेवकांचा एक गट आता चिंचवड मतदार संघामध्ये सक्रिय झाला आहे. राजकीय जीवनात सुरूवातीच्या काळात गावडेंनी नाना काटे यांना मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष असलेले गावडे यांना चिंचवड मतदार संघात मानणारा मोठा वर्ग आहे. गावडे गट सक्रिय झाल्यामुळे चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून २०२४ मध्ये राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button