breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

Fact Check : सत्ताधारी भाजपाचे नाराज नगरसेवकांची खरी भूमिका काय?

भोसरीतील भाजपाच्या ‘त्या’ नगरसेवकांनी व्यक्त केल्या भावना

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (२०२२) भोसरी विधानसभा मतदार संघातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतील सुमारे ३० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करतील, असा दावा ‘सोशल मीडिया’ वर करण्यात आला. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत ‘महाईन्यूज’ ने “Fact Check” करण्याचा प्रयत्न केला.

माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी मतदार संघात बैठका आणि भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. भाजपातील नाराजांची मोट बांधून निवडणुकीत मुसंडी मारण्याची तयारी सुरु केली आहे.

सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक आणि माजी क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त लांडे यांनी त्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी नगरसेवक रवी लांडगे हेसुद्धा उपस्थित होते. नगरसेवक नेवाळे यांच्या समर्थकांनी प्रमुख चौकांमध्ये विधानसभा ‘बॅकग्राउंड’  असलेले फ्लेक्स उभारले. त्यामुळे नेवाळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे यांच्या समर्थकांनीही ‘वेळ बदलणार’ अशा आशयाचे फ्लेक्स वाढदिवसानिमित्त उभारले. गेल्या अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादीत जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यासह नगरसेवक लक्ष्मण सस्ते, वसंत बोराटे, नगरसेविका निर्मला गायकवाड, उद्योजक संतोष बारणे अशी नाराजांची नावे समोर येत आहेत. याबाबत कुणाची काय भूमिका आहे? याचा अंदाज ‘महाईन्यूज’ ने घेतला. तो पुढीलप्रमाणे आहे.

नगरसेवक वसंत बोराटे काय म्हणाले…?

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांचा मी निष्ठावंत समर्थक आहे. आमचे नाते राजकारणापलिकडचे आहे. त्यामुळे लांडगे घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असतो, अशी भूमिका नगरसेवक वसंत बोराटे यांनी व्यक्त केली. ‘सोशल मीडिया’ वर निराधार पोस्ट व्हायरल केल्यामुळे विरोधकांना राजकीय गुदगुल्या होत आहेत. पण, आपण आमदार लांडगे यांचे निष्ठावंत आहोत. पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा लांडगेंसोबत राहण्यात मी समाधानी आहे, असा दावा नगरसेवक बोराटे यांनी केला आहे.

नगरसेविका निर्मला गायकवाड काय म्हणाल्या?

आमदार महेश लांडगे हे माझे बंधू आहेत. मला पद मिळाले नाही, पुन्हा नव्याने संधी मिळेल. राजकीय पदासाठी आम्ही राजकारण करीत नाही. पद मिळो ना मिळो राजकारण आणि नातं यात आम्ही गफलत करणार नाही.

उद्योजक संतोष बारणे काय म्हणाले?

मोशी येथील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांचा मी समर्थक आहे. दादा म्हणतील, ती पूर्व दिशा राहील. नाराजी असण्याचे कारण नाही.

नगरसेवक संजय नेवाळे म्हणतात भाजपा सोडणार…

महापालिकेतील माजी क्रीडा समिती सभापती व नगरसेवक संजय नेवाळे म्हणाले की, भाजपामध्ये मला काहीही मिळालेले नाही. समर्थकांनी वाढदिवसानिमित्त जोरदार फ्लेक्सबाजी केली. मी कुणाला सांगितले नाही जाहिरात करा. पण, सत्ताकाळात भाजपाकडून महत्त्वाचे पद मिळालेले नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

नगरसेवक रवि लांडगे यांचे ‘वेट अँन्ड वॉच’…

माझ्या वाढदिवसानिमित्त समर्थक आणि कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उभारले आहेत. त्यात वावगे काहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जणार वगैरे…असे मी कुठेही म्हटलेले नाही. पण, वेळ आल्यावर पत्रकार परिषद घेवून मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.

नगरसेविका अश्विनी जाधव काय म्हणाल्या?

चिखली येथील नगरसेविका अश्विनी जाधव म्हणाल्या की, मी आमदार लांडगे यांच्यावर नाराज नाही. आम्ही भाजपा सोडणार असा मुद्दाच नाही. आमदार लांडगे यांच्या सूचनेनुसारच आम्ही वाटचाल करीत आहोत.

नगरसेविका अश्विनी बोबडे यांची भूमिका काय?

नगरसेवक संजय नेवाळे माझे मित्र आहेत. त्यांचा वाढदिवस होता म्हणून मी शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे त्या ठिकाणी उपस्थित होते. भाजपामधून आम्ही बाहेर पडण्याचा विषयच येत नाही, अशी भूमिका भीमा बोबडे यांनी मांडली आहे.

नगरसेविका प्रियांका बारसे काय म्हणतात?

मी भाजपामध्ये समाधानी आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी सक्षम होते म्हणूनच मला भाजपाने तिकीट दिले होते. शेवटपर्यंत भाजपाचे काम करणार आहे. नाराजी असल्याची चर्चा निराधार आहे, अशी भूमिका नगरसेविका प्रियांका बारणे यांनी व्यक्त केली आहे.

नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, होवू शकला नाही.

Fact Check : ‘महाईन्यूज’ ने घेतलेल्या माहितीनुसार, भोसरी मतदार संघातील नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका निर्मला गायकवाड, अश्विनी जाधव, उद्योजक संतोष बारणे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यासोबत राहणार असल्याचा दावा केला आहे. तर नगरसेविका अश्विनी बोबडे, प्रियांका बारसे यांनी भाजपासोबत कायम राहणार असे म्हटले आहे. नगरसेवक रवि लांडगे यांनी ‘वेट अँन्ड वॉच’ अशी भूमिका मांडली आहे. मात्र, नगरसेवक संजय नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

***

निष्कर्श : भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे नाराज २५ ते ३० नगरसेवक आहेत. या चर्चेमध्ये तथ्य नाही. तसेच, नगरसेवक संजय नेवाळे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नगरसेवकाने भाजपातून बाहेर पडण्याबाबत सुतोवाच केलेले नाही. चर्चेत असलेल्या काही नगरसेवकांनी भाजपावर आणि काहींनी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button