Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

गाडीतून बाहेर पडायला एका सेकंदाचाही उशीर झाला असता तर…

मुंबई: ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. राज्याच्या इतर भागांप्रमाणे मुंबईतही पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. विशेषत: पहाटेच्या वेळेत मुंबईत जोरदार पाऊस बरसताना दिसत आहे. मंगळवारी पहाटेही मुंबईत असाच धो-धो पाऊस सुरु असताना काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. मुंबईच्या अंधेरी परिसरात मंगळवारी पहाटे कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जात असलेली कार एका मोठ्या नाल्यात कोसळली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस पडत असल्याने या नाल्याला भरपूर पाणी होते. तसेच पहाटे पावसाचा जोर असल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार होता. त्यामुळे ही कार नाल्यात पडताक्षणी बुडायला लागली. मात्र, कारमधील कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडण्यात यश मिळवले आणि त्यांचा जीव वाचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी सबवेनजीक असलेल्या मोगरा नाल्यात ही दुर्घटना घडली. हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम या वॉर्डात येतो. मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस पडत असल्याने अंधेरी सबवेच्या परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे अंधेरी सबवे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका कॉल सेंटरमधील कर्मचारी आपले काम संपवून गाडीने घरी निघाले होते. या गाडीत तीन महिला आणि दोन पुरुष कर्मचारी होते. त्यांची गाडी नाल्यात पडल्यानंतर हे सर्वजण केवळ सुदैवाने बचावल्याचे पोलिसांनी सांगितले.ही गाडी नाल्यात पडल्यानंतर तेथील एका गॅरेजच्या मालकाने डी.एन. नगर पोलीस ठाण्यात फोन केला. त्यानंतर पोलिसांची गाडी तात्काळ मोगरा नाल्यापाशी पोहोचली. तेव्हा नाल्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत होता. या गाडीतील कर्मचारी वाचणे हा निव्वळ चमत्कार आहे. गाडीतून बाहेर पडायला एका सेकंदाचाही उशीर झाला असता तरी या सगळ्या कर्मचाऱ्यांचा जीव गेला असता, असेही पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर गाडीतून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांना तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने या सगळ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ९ वाजता ही कार क्रेनच्या साहाय्याने नाल्यातून बाहेर काढण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button