breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

‘मी गाण्यातून ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही,’ उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; ‘हिंदुत्व…’

प्रचार गीतावरुन राजकारण पेटले : शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजपा आमने-सामने

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Faction) नव्या प्रचार गाण्यामधील भवानी (Bhavani) आणि हिंदू (Hindu) या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित हे दोन शब्द कोणत्याही परिस्थितीत काढले जाणार नाहीत, असं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे प्रचारातील व्हिडीओ दाखवत आधी त्यांच्यावर कारवाई करण्याचं आव्हान दिलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचार गीतामधील दोन शब्दांवर आक्षेप घेतल्यासंबंधी तसंच त्यावर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं आहे. त्यावर ते म्हणाले की, “तो त्यांच्यातला आणि निवडणूक आयोगातील प्रश्न आहे. त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. पण हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी गाण्यात ‘जय भवानी’ शब्द तरी कशासाठी आणावा असा प्रश्न निर्माण होतो”. उद्धव ठाकरेंनी त्यांचे आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवावेत असा टोलाही त्यांनी लगावला.

“मला सगळीकडे महायुतीसाठी सकारात्मक वातावरण दिसत आहे. लोकांचं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे. एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वातील सरकार आपल्या अडचणी सोडवतील असा लोकांना विश्वास आहे. त्यामुळे लोकांचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे. हिंगोली आणि यवतमाळमध्ये आम्ही चांगल्या फरकाने जिंकू,” असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले आहेत?

अटलजी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क 6 वर्षासाठी काढून घेतला होता. हिंदू धर्माचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारातील भाषणात ‘बजरंग बली की जय बोलून बटण दाबा’ असं सांगतायत. अमित शाह ‘बजरंग बलीचं दर्शन देतो’ असे म्हणतात. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

आमचं पुर्वीचं गीत जनता उत्साहाने गाते. आम्ही मशाल चिन्ह मिळाल्यानंतर प्रेरणा गीत आणलं. त्यातील हिंदु हा तुझा धर्म, जाणून घे मर्म..यातील हिंदू हा शब्द निवडणूक आयोगाने काढायला लावला आहे. आम्ही हिंदू धर्माच्या आधारे मत मागितलं नाही. चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जय भवानी, जय शिवाजी घोषणा आहे. यातील जय भवानी हा शब्द काढावा असे आयोगाने म्हटले आहे. तसेच हिंदु हा तुझा धर्म या शब्दावरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button