महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटुंबांसाठी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/www.mahaenews.com-4-1-780x470.jpg)
मुंबई: राज्यातील केवळ गरीब, गरजू नागरिकांसाठी जुलै २०१२ पासून लागू करण्यात आलेली महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ अंत्योदय, पिवळे किंवा केशरी कार्डधारकांना मिळत होता.
रुग्णांच्या आरोग्य विमा सरंक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब एक लाख ५० हजार रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.राज्यातील एक हजार ९०० रुग्णालयांमार्फत एक हजार ३५६ प्रकारचे छोटे मोठे उपचार या विमा संरक्षणा अंर्तगत केले जाऊ शकणार आहेत.हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मिळणारा प्रतिसाद पाहता ३४७ ठिकाणी ही चिकित्सालय सुरू करण्यात आली आहेत. या उपक्रमावर ७८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
हेही वाचा – विधानसभेत पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाची चर्चा; देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती
राज्यातील महिलांच्या स्तन कर्करोग आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांना या आजाराची तपासणी सहज व स्वस्त व्हावी यासाठी सर्व आरोग्य उपकेंद्रात महिलांसांठी स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गर्भवती महिला व बालकांसाठी आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी राज्यात ३ हजार ३२४ रुग्णवाहिका आहेत. यातील जुन्या झालेल्या रुग्णवाहिकांच्या जागी नवीन रुग्णवाहिका लवकरच विकत घेतल्या जाणार आहेत.