दिल्लीत करोना रुग्ण संख्येत कमालीची घट; रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांखाली
![696 new coronary artery disease patients in Mumbai and 239 in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/319718852-corona-1532x900-adobestock-2-2.jpg)
नवी दिल्ली |
देशात आलेली करोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. दिल्लीतही करोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकारला यश आलं आहे. सलग सहा आठवडे लॉकडाउन करत आणि वैद्यकीय सुविधा वाढवल्याने रुग्णसंख्येत कमालीची घट झाली. दिल्लीत गेल्या २४ तासात करोना रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांच्या खाली आला आहे. दिल्लीत १९ मार्चनंतर पहिल्यांदाच करोना रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांच्या खाली आला आहे. दिल्लीत मागच्या २४ तासात ६४८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८६ जण करोनामुळे दगावले आहे.
दिल्लीत सध्या ११ हजार ४० करोना सक्रिय रुग्ण आहेत. १ एप्रिलनंतर सक्रीय करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तसेच दिल्लीत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.५२ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर १.७ टक्के इतका नोंदवला गेला आहे. सध्या राज्यात ०.७७ टक्के सक्रिय करोना रुग्ण आहेत. दुसरीकडे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पुन्हा एकदा करोना परिस्थितीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केलीय. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांच्या बाता करता करता केजरीवाल सरकारने दिल्लीला प्रती १० लाख व्यक्तींमधील मृत्यूच्या यादीत आघाडीवर आणून दाखवण्याच काम केल्याची टीका गुप्ता यांनी केलीय. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही गुप्ता यांनी केलाय. केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत असल्याचा टोला गुप्ता यांनी लगावला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही केजरीवाल यांनी करोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा दावा गुप्ता यांनी केलाय.