#Covid-19: खासगी रुग्णालयांची १ मेपासून कंपन्यांकडून थेट लस खरेदी
![# Covid-19: Private hospitals purchase vaccines directly from companies from May 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-vaccine_1584368936.jpg)
पुणे |
येत्या १ मेपासून खासगी कोविड लसीकरण केंद्रे किंवा रुग्णालये थेट कंपन्यांकडून लस खरेदी करू शकतील. त्यामुळे त्यांना सरकारकडून २५० रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या मात्रा बंद होणार आहेत. परिणामी ज्यांना शक्य असेल त्या ग्राहकांना जादा दराने खासगी लसीकरण केंद्रातून लस घेता येणार आहे. लशीच्या किमतीबाबत सरकारने राष्ट्रीय धोरण जाहीर केले असून आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी, ४५ वयावरील व्यक्ती यांना लस सरकारी लसीकरण केंद्रात मोफतच मिळणार आहे. लस उत्पादकांना १ मे पूर्वी केंद्र सरकारला पन्नास टक्के पुरवठा करण्याची हमी द्यावी लागणार आहे.
राज्य, खासगी रुग्णालये, औद्योगिक वसाहती थेट उत्पादकांकडून लस खरेदी करू शकतील. खासगी रुग्णालयांना कोविड १९ लशीची खरेदी सरकारी कोटा वगळून करावी लागणार आहे. खासगी रुग्णालयांकडून लसीकरणासाठी लावला जाणारा खर्च व इतर खर्च यावर सातत्याने निगराणी ठेवण्यात येणार आहे. सध्या काही खासगी केंद्रांना सरकारकडून लस दिली जात असून तेथे २५० रुपयांना एक मात्रा देण्यात येत आहे, ही सवलत ३० एप्रिल नंतर राहणार नाही. लस उत्पादक कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या लशीपैकी पन्नास टक्के मात्रा केंद्र सरकारला द्याव्या लागतील, उरलेल्या पन्नास टक्क््यातून राज्य सरकारे व खुल्या बाजारात लशीची खरेदी होईल. सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण मोफत राहील, त्यासाठी यापुढेही ‘कोविन’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
वाचा- आमदार महेश लांडगे यांचा दणका: पिंपरी-चिंचवडला मिळाला पहाटे ऑक्सिजन पुरवठा!