breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरला मुसळधार पावसाचा दणका

  • रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरला मुसळधार पावसाचा दणका

रत्नागिरी |

गेले काही दिवस दुपारनंतर जोर धरणाऱ्या पावसाचा रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात जास्त प्रभाव जाणवत असून रत्नागिरीसह संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांना या पावसाने दणका दिला आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात प्रत्येकी चार इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. वेगवान वाऱ्याबरोबर पावसाचा जोर वाढत गेला. याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी तालुक्यासह संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात बसला. मध्यरात्रीच्या सुमारास काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाणी भरण्याची शक्यता लक्षात घेऊन दुकान चालकांनी वेळीच साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले. सोमेश्वर मोहल्लय़ात पाणी शिरले. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी गेल्याने रस्ता बंद केला. मात्र एक मोटारसायकल स्वार (एमएचएएफ—४२१६) पाण्यातून पुढे जात होता. प्रवाहामुळे गाडी वाहून जाऊ लागली. त्याला एनडीआरएफसह ग्रामस्थांनी वाचवले. तर एक चारचाकी गाडी वाहून गेली. त्यातील प्रवासी आधीच उतरल्याने वाचले.

रत्नागिरी तालुक्यामध्ये दहा ठिकाणी दरडी कोसळल्या, तर वीसहून जास्त घरांना पुराचा फटका बसला. रात्रभर धुमाकूळ घालणारा पाऊस पहाटे थांबला. या तुलनेने जिल्ह्याच्या उत्तर भागातील पाचही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. रत्नगिरी तालुक्यातील हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळून चार वाडय़ांशी संपर्क तुटला ह. पानवल येथे तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली. वाऱ्यामुळे येथील एका घराचे पत्रे उडून अंशत: नुकसान झाले. निवळी येथे चार ठिकाणी डोंगरातील माती घरापर्यंत आली होती. मुंबई—गोवा चौपदरीकरणाची माती निवळी—उपळेकडे जाणाऱ्या मार्गावर पसरली. शिवरेवाडीतही डोंगरातील माती पाण्याबरोबर आल्याने रस्ता वाहतुकीला बंद होता. संगमेश्वर वायंगणीत कोसळलेली दरड हटवण्याचे काम सोमवारी सायंकाळपर्यंत चालू होते. तळेकांटे येथेही रस्त्यावरील मोरी खचल्याने, तर संगमेश्वर येथे रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. लांजा—वेरळ रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक खंडित होती.

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरीतील अनेक नद्यांना पूर आला. वेगवान वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने हातखंबा नागपूरपेठ परिसरातील ग्रामस्थांची रात्रीच्या अंधारात त्रेधातिरपिट उडवली. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी वाढले आणि किनाऱ्यावरील घरांच्या अंगणापर्यंत पोचले. काहींच्या पायरीला पाणी लागले होते. तासाभरानंतर ते ओसरले. पण घरात पाणी शिरेल असा कुणालाही अंदाज नव्हता. काही समजण्याच्या आत अंधारात अचानक पाण्याचा लोंढा आला आणि घरांना वेढा घातला. कडी लावलेले दरवाजे तोडून पाणी घरात शिरले. येथील रहिवासी शामला कोळसेकर यांच्या घरात आई आणि मुलगा दोघेच होते. ग्रामस्थांनी आईला सुरक्षित ठिकाणी नेले. मुलगा सन्मित्र हा पाणी कमी होईल, या शक्यतेने घरातच थांबला होता. पण ते कमी होण्याऐवजी वाढतच गेले. त्यामुळे तो पत्र्यावर चढला. तेथून ग्रामस्थांना आवाज दिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सर्वजण सरसावले. सुमारे एक तासाच्या प्रयत्ननंतर अखेर दोरी कंबरेला बांधून त्याला बाहेर काढण्यात आले. कोळसेकर यांच्या घरातील सर्वच साहित्य वाहून गेले होते. शामला शांताराम कोळसेकर यांचे ३ लाख २७ हजाराचे नुकसान झाले. त्यांच्या शेजारी असलेल्या मनोहर बापू नाचणकर यांच्या घरातील कपडे—लत्ते, सोन्या—नाण्यासह पैसे असेलेले कपाट, इलेक्ट्रिकचे साहित्य इत्यादीसह सर्व वस्तू वाहून गेल्या. यामध्ये सुमारे दहा लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या व्यतिरिक्त भिकाजी तोडणकर यांचे ५० हजार, शशिकांत दाजी बोंबलेंचे ५० हजार, बाळकृष्ण शितप ४८ हजार, मधुकर बोंबले १४ हजार, यशवंत बोंबले ६५ हजार ६७५, छाया पांडुरंग बोंबले यांचे नवीन घरकुलाचे ८१ हजार ६५०, शिवाजी सदाशिव बोंबले ६८ हजार ४००, नागेश चव्हाण ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. पूर आल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूरकर पेठेत सुमारे पन्नास घरांमधील लोक जागे होते. हनमुान मंडळाच्या कार्यकर्त्यांंनी पुरात अडकलेल्यांना मदतीसाठी हात दिला. माझ्या आयुष्यात येथे अशा प्रकारे पुराचे तांडव प्रथमच पहायला मिळाले आहे. ही रात्र अंगावर काटा आणणरी होती, असे ग्रामस्थ मितेश कामेरकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९८.६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक, १९३.३ मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर, संगमेश्वर (१२३.९) आणि राजापूर तालुक्यालाही (११४.८) या पावसाने दणका दिला. याशिवाय, गुहागर (९७.९), दापोली (९९.७), लांजा (९५.४) आणि खेड (७९.८) याही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीय राहिले. त्या तुलनेत मंडणगड (५१) व चिपळूण (३२.४०) तालुक्यात तो कमी राहिला.हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button