ताज्या घडामोडीविदर्भ

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’

नागपूर| स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकावा, यासाठी ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. नागपूर शहरात सात लाख घरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात बारा लाख तिरंगा लावण्यात येणार आहे. राष्ट्राभिमान जागृत करणाऱ्या या उपक्रमात राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा, त्याचा अवमान होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ध्वजसंहितेची माहिती जाणून घेऊया…

-ध्वजसंहितेनुसार आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशिनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल.

-प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये.

-राष्ट्रध्वजाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण ३:२ या प्रमाणात असावी.

-ध्वज फडकविताना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्तावेळी रोज उतरवावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे.

-राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

-तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा खालच्या बाजूने राहील याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो.

-राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.

– राष्ट्रध्वज लावताना इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही

– राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.

– ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरचिन्ह लावू नये. तसेच ध्वजस्तंभाच्यावर अथवा आजूबाजूला काही लावू नये.

– ध्वज जमिनीपासून उंचीवर लावावा. जमिनीवर अथवा पाण्यामध्ये बुडणार नाही, याची काळजी घ्यावी.

– राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणे दंडनीय गुन्हा आहे.

– ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबल क्लॉथप्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.

– राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये.

– तो एकाच वेळी इतर ध्वजांसोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये.

– राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये.

– राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

– आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान, अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल, असे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वजसंहिता पाळण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button