TOP Newsताज्या घडामोडीपुणे

नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणांवर हातोडा

नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, कात्रज चौक ते कात्रज घाट आणि कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या परिसरात अनेक हॉटेल, मद्यालये, विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत महापालिकेने हात वर केले असल्याची तक्रार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. त्यावर विभागीय आयुक्त राव यांनी एनएचएआयकडे या अतिक्रमणांची यादीच मागवली आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

नवले पूल परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणचे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजूची स्वतंत्र मार्गिका करण्यात आली आहे. हे बदल लक्षात येण्यासाठी कात्रज बोगदा संपल्यानंतर एक तपासणी नाका उभा करून तेथे कायम एक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील मोठे फलक लावण्याचे काम सुरू आहे. याशिवाय वेगाला अडथळा आणण्यासाठी या सात कि.मीमध्ये आतापेक्षा जास्त उंचीचे रम्बल स्ट्रीप बसविण्यात येणार असून बोगद्यापासून नवले पुलापर्यंत जड वाहने न्यूट्रल करू नये, यासाठी उद्घोषणा कक्षाद्वारे चालकांना सांगण्यात येणार आहे आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पादचारी उन्नत मार्ग (स्कायवॉक) उभारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय एका स्वयंसेवी संस्थेला अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्याचे काम देण्यात आले आहे. लवकरच त्यांचा अहवाल येणार असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

‘नवले पूल परिसरात २० नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यामध्ये एनएचएआयकडून या ठिकाणी मोठ-मोठी हॉटेल, काही संस्था, मद्यालये यांनी अतिक्रमण केले असून संबंधितांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर एनएचएआयकडून संबंधित अतिक्रणांची यादी मागविण्यात आली आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांना आदेश देऊन निश्चित कारवाई करण्यात येईल.- सौरभ राव, विभागीय आयुक्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button