ताज्या घडामोडीमुंबई

एसटी संपकाळात गुणरत्न सदावर्ते मालामाल; घरात नोटा मोजण्याचे मशीन

मुंबई|राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरातून पोलिसांनी पैसे मोजायचे मशीन हस्तगत केले आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले पैसे याच मशीनद्वारे मोजल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी संपकाळात खरेदी केलेल्या मालमत्तांचीही पोलीस चौकशी केली जाणार आहे. यामुळे सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

शरद पवार यांच्या नेपियन्सी रोडवरील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एस. टी. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे सूत्रधार म्हणून वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात नसले तरी एस. टी. कर्मचारी आंदोलन आणि त्याच्या कटाबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. गावदेवी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी अटक केलेल्या मनोज मुदलियार याला मंगळवारी गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तपासामध्ये पुढे आलेल्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या. यामध्ये त्यांनी सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर येथील घरातून पैसे मोजण्याचे मशीन जप्त केल्याची माहिती दिली. तसेच सदावर्ते यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपकाळात नवीन गाडी , काही मालमत्ता खरेदी केल्याचे समजत असून ही खरेदी कोणत्या पैशातून करण्यात आली याची पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

११८वा आरोपी अटकेत

गावदेवी पोलिसांनी या गुन्ह्यात मनोज मुदलियार या आरोपीला अटक केली आहे. मनोज याच्या अटकेमुळे या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या ११८वर गेली आहे. आंदोलनापू्र्वी सिल्व्हर ओक बंगल्याची रेकी केल्याचा आरोप मनोज याच्यावर आहे. मनोजसह या प्रकरणात अटकेत असलेले अजित मगरे, संदीप गोडबोले यांची २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button