breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राउंड रिपोर्ट: शिवसेना ठाकरे गटाचा चिंचवडच्या जागेवर ‘क्लेम’!

पोटनिवडणूक  : विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे, आमदार सचिन आहिर यांची उपस्थिती

पुणे । विशेष प्रतिनिधी 

पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आता मैदानात उतरला असून, उद्या दि. ३ फेब्रुवारी रोजी दोन्ही शहरांतील निमंत्रितांची बैठक घेण्यात येणार आहे. या दोनपैकी चिंचवडच्या जागेवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला असून, या बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

पोटनिवडणुकीत चिंचवडची जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर आणि कसब्याच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाला संधी मिळाणार नाही. यावर शिक्कामोर्बत झाले आहे. त्यामुळे ‘मशाल’ चिन्हावर एकतरी जागा लढवावी, असा सूर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा आहे. 

यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या, दि. ३ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत दोन्ही शहरातील निमंत्रित पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर वाकड येथील हॉटेल टिपटाॅपमध्ये सकाळी ९ वाजता पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची आणि सकाळी १० वाजता पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव आहे. या पोटनिवडणुकीत ‘मशाल’ चिन्हासह शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यावी. त्यासाठी सहा ते सातजण इच्छुक आहेत, अशी आमची आग्रही मागणी आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला मानणारा मोठा मतदार असल्याचे आकडेवारीवरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिल्यास ‘मशाल’ चिन्हावर ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू शकतो. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही चिंचवडची जागा ‘घड्याळ’ चिन्हावर लढवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत पुण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चिंचवड पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावरच लढवणार, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून ‘मशाल की घड्याळ’ कोणत्या चिन्हावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button