breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: राष्ट्रवादीच्या भूमिकेने आमदार महेश लांडगेंचे ‘टेन्शन वाढले’

आगामी निवडणुकांत विलास लांडेंशीच खुला सामना: भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘मास्टर प्लॅन’

पुणे । विशेष प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ‘राजकीय ताकद’ देण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे लांडगेंना रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीने त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विलास लांडे यांना मैदानात उतरवले आहे.
विलास लांडे याचा वाढदिवस (दि.१ जून) नुकतचा उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने लांडे समर्थकांनी ‘भावी खासदार’ अशी जोरदार ‘ब्रँडिंग’ केली. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत शिरुरचा उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच राहतील, अशी घोषणा केली.

परिणामी, माजी आमदार विलास लांडे २०२४ मध्ये भोसरी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा उतरणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे लांडगे विरुद्ध लांडे अशी तगडी ‘फाईट’ होणार असून, भाजपाची ‘अँटी इनकंपन्सी’ महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. याचा फायदा विलास लांडे यांना होणार आहे.

सध्यस्थितीला भाजपाचा पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील प्रभावी स्थानिक चेहरा म्हणून पाहिले जात आहे. किंबहुना, लांडगे यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात येईल, अशीही चर्चा आहे. स्थानिक पातळीवर लांडगे यांना आव्हान देणारा तोडीस तोड नेता म्हणून विलास लांडे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे भाजपाची नाकाबंदी करायची असेल, तर लांडे यांना ताकद देण्याशिवाय पर्याय नाही, अशी राजकीय स्थिती आहे. दुसरीकडे, आमदार लांडगे यांच्या विरोधातील सुमारे ७० हजार मतदान खेचण्याची आणि लांडगे विरोधकांची वज्रमूठ करण्याची क्षमता ही लांडे यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार महेश लांडगे यांची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे.


विलास माझा कार्यकर्ता… कितीदा त्याने तयारी करायची…

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यात मनभेद आहे, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण, पुण्यात लोकसभा आढावा बैठकीत अजित पवार यांनी थेट लांडे यांचे समर्थन केल्याची माहिती आहे. बैठकीत अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले की, डॉ. कोल्हे तुम्ही निवडणूक लढवणार किंवा नाही… ते एकदा जाहीर करा… कितीदा विलास लांडे यांनी तयारी करायची. तो माझा कार्यकर्ता आहे… आम्हाला पुढची दिशा ठरवता येईल…’’ या वाक्यामुळे डॉ. कोल्हे यांना निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगावे लागले, तर विलास लांडे यांना राजकीय बळ मिळाले. कारण, लांडे यांनी २००९ मध्ये ही लोकसभा लढवली आहे आणि २०१९ ची तयारीसुद्धा केली होती. आता अजित पवार यांचा बदलेली भूमिका पाहता आगामी काळात लांडे यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जाईल आणि आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडचा स्थानिक प्रभावी चेहरा म्हणून ‘प्रमोट’ करण्यात येईल, असे संकेत आहेत.


विलास लांडे यांची चाणक्यनिती…

डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे ‘स्टार प्रचारक’ आहेत. लोकसभा उमेदवारीवर दावा करुन लांडे यांनी विधानसभेची दावेदारी ‘मजबूत’ केली आहे. कारण, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतील उमेदवारीबाबत एकमत झाले नव्हते. दिवंगत विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी उमेदवारीवर दावा केला होता. त्यामुळे संभाव्य बंडखोरीचा धोका ओळखून लांडे यांनी पक्षाच्या तिकीटावर शिक्कामोर्तब करण्यास ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवली होती. भाजपाची लाट हासुद्धा ‘फॅक्टर’ होता. पण, निर्णय घेण्यातील वेळकाढूपणामुळे भाजपाला फायदा झाला. आता आगामी निवडणुकीत लांडेंना ही चूक करायची नाही. त्यामुळे शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्षश्रेष्ठींकडून विधानसभेसाठी ‘क्लिनचिट’ मिळवली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button