breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट : राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांना विधानसभेची ‘लॉटरी’

आमदार अण्णा बनसोडे यांना पक्षांतर्गत विरोध : २०२४ मध्ये पिंपरी मतदार संघातील चित्र बदलणार?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी विधानसभा मतदार संघातील आमदार अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेशी (शिंदे गट) जवळीक साधली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालय भेटीनंतर बनसोडे २०२४ ला ‘धनुष्यबाण’ हातात घेणार, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिकीटासाठी दावेदार असलेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलंवत यांना उमेदवारीची ‘लॉटरी’ लागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट दिली. यापूर्वी, मुख्यमंत्री व बनसोडे यांचा एकत्रित वाहन प्रवाससुद्धा चर्चेत आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांपूर्वी बनसोडे यांची शिवसेनेशी वाढलेली जवळीक आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. 

पिंपरी विधानसभा मतदार संघ राखीव असून, यापूर्वी ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी या मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर अर्थात ‘धनुष्यबाण’  चिन्हावर विजय मिळवला होता. मतदार संघात भाजपापेक्षा भाजपाविरोधी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजपाऐवजी ‘महायुती’चा उमेदवार म्हणून आमदार बनसोडे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवतील. जागा वाटपामध्ये चिंचवड आणि भोसरी मतदार संघ भाजपाला सोडला, तर शिवसेना पिंपरी मतदार संघावर दावा करणार, हेसुद्धा प्रमुख कारण आहे. 

पक्षांतर्गत कुरघोडी आणि निर्णय प्रक्रियेत ‘साईडट्राईक’ केले जात असल्यामुळे बनसोडे आणि स्थानिक नेत्यांमध्ये मनभेद आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००९ आणि २०१९ मध्ये विजय मिळवल्यानंतर अनुभव असतानाही अण्णा बनसोडे यांना मंत्रीमंडळ किंवा महामंडळावर संधी दिली नाही. मध्यंतरी, गोळीबार प्रकरणात राज्यात सत्ता असताना अपेक्षीत मदत झाली नाही. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना महायुतीच्या माध्यमातून सत्तेत राहण्यासाठी बनसोडे राष्ट्रवादीतून बाहेर पडतील. कारण, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपामधील नाराज नगरसेविकेला ‘प्रमोट’ केले जात आहे. बनसोडे यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यासाठी आणि त्यांना तिकीट दिले, तर जागा जाईल, असे ‘परसेप्शन’ तयार करण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट सक्रीय आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट की केवळ सदिच्छा भेट होती. यामागे काही राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण आमदार बनसोडे यांच्याकडून दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बनसोडे राष्ट्रवादीतच राहतील की शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा विधानसभा जिंकतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आयात नको… निष्ठावंताला संधी द्या..!

२०१९ मध्ये माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत   यांना राष्ट्रवादीची उमेदवारी घोषीत झाली होती. मात्र, ऐनवेळी आमदार बनसोडे यांचा अर्ज कायम करण्यात आला. राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी शिलवंत यांना माघार घेण्याचा आदेश दिला. आता २०२४ मध्ये शिलवंत पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपातील आयात उमेदवाराला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची रणनिती राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांनी आखली आहे. मात्र, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे ‘‘आम्हाला आयात नको, पक्षाच्या निष्ठावंत उमेदवारला संधी द्या…’’ असा सूर जोर धरु लागला आहे. त्यामुळे पिंपरीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची शक्यता आहे, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button