breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेखसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट: कसबा काँग्रेसला, चिंचवड राष्ट्रवादीला, तर बंडखोरीची ‘मशाल’ पेटणार?

पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला संधीची प्रतीक्षाच?

२१ पैकी एकाही विधानसभा मतदार संघात प्रतिनिधीत्व नाही

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. ठाकरे गट आणि शिंदे गट अशी दुफळी झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पण, त्यापूर्वीच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात क्षमता असतानाही एकही आमदार निवडून आला नाही. आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून ‘मशाल’ पेटवण्याची संधी असतानाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे जिल्हयात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी , भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटॉन्मेंट व कसबा पेठ या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या भागांमध्ये शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार आहे. मात्र, २०१९ मध्ये शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार झाली. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.

दरम्यान, चिंचवड आणि कसबा या ठिकाणची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपाचा प्रस्ताव होता. मात्र, मी निवडणूक कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड मधील पोटनिवडणुकीचा दाखला देत चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक लढविण्यावर मी ठाम असल्याचे सांगत चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी माझ्याकडे आत्तापर्यंत 8 ते 9 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार ‘घड्याळ’ चिन्हावर लढवण्यात येईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

तसेच, कसबा मतदार संघावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. सन १९९१मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वसंत थोरात यांनी भाजपचे गिरीष बापट यांचा पराभव केला होता. आता या इतिहासाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी इच्छुकांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना साकडे घातले आहे.

परिणामी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्रतिनिधीत्व मिळणार नाही. पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि सहकाऱ्यांना चिंचवड किंवा कसबा मतदार संघात प्रतिनिधीत्व मिळावे. अंधेरीच्या धर्तीवर ‘मशाल’ चिन्हावर ही निवडणूक महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी लढवावी. त्याद्वारे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचा विस्तार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा चिंचवडमधील निष्ठावंत शिवसैनिकांकडून बोलून दाखवली जात आहे. कारण, २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना दोन क्रमांकाची मते पडली आहे. तसेच, २०१९ मध्ये शिवसेनेने कलाटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर महापालिका निवडणुकीत ६ नगरसेवक निवडून आले होते आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे, असा दावा ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केला आहे.

बंडखोरी रोखण्याचे महाविकास आघाडीला आव्हान…

याउलट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड.सचिन भोसले, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी. याकरिता प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवले आहेत. खासदार संजय राऊत यांनी चिंचवडची जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी गेल्या आठवड्यातच केली होती. चिंचवडमध्ये शिवसेनेला (ठाकरे गट) मानणारा वर्ग आहे. या मतदार संघातून महापालिका निवडणुकीत ६ नगरसेवक निवडून आले होते. याहून जगताप यांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे यांनी २०१४ ची निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर आणि २०१९ ची निवडणूक पाठिंब्याने लढवली आहे. त्यामुळे या मतदार संघात ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा दावा केला होता. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाना काटे, भाउसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे असे दिग्गज इच्छुक आहेत. तसेच, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राहूल कलाटे उमेदवारी मागत आहेत. तिकीट एकालाच मिळणार आहे. त्यामुळे ‘‘अभी नहीं तो कभी नहीं’’ या भावनेतून महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button