breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: आत्मकेंद्री राजकारणामुळेच पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमागे पराभवाचे शुक्लकाष्ट?

नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या काळात पराभवाची मालिका कायम; शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह पक्षश्रेष्ठींना आत्मचिंतनाची गरज

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
एकेकाळी पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना गेल्या ९ वर्षांपासून निर्णायक विजयासाठी शहर राष्ट्रवादी चाचपडत असताना दिसत आहे. २०१७ ते २०२२ दरम्यान ३७ नगरसेवक असतानाही शहर आणि परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी ‘बॅक फूट’ आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठींना आत्मचिंतनाची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून पिंपरी-चिंचवड शहरात सलग २० वर्षे एकहाती सत्ता राखण्यात नेते अजित पवार यांना यश मिळाले होते. मात्र, २०१४, २०१९ अशी विधानसभा, लोकसभा आणि त्यापूवी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले.

शहरात पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अजित पवार यांनी नवोदित चेहऱ्यांना संधी दिली. अजित गव्हाणे, कविता आल्हाट, इम्रान शेख अशा तरुणांना महत्त्वाच्या जबबादाऱ्या देण्यात आल्या. मात्र, माजी महापौर संजोग वाघेरे, आझम पानसरे, योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह भाऊसाहेब भोईर यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देता आली नाही. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात यापैकी काहींना राज्य पातळीवर जबाबदारी देता आली असती, मात्र, तसे न झाल्यामुळे केवळ ‘‘मार्गदर्शक’’ इतकीच ओळख या नेत्यांसमोर राहिली. त्याचा फटका राष्ट्रवादीला आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये बसला आहे, ही वस्तुस्थिती आहे.
**
बाजार समिती निवडणुकीत लांडे, वाघेरे अलिप्त…
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘डंका’ असताना मात्र, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’ झाला. या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी बोध घेणे अपेक्षीत आहे. या निवडणुकीत नाती-गोती आणि पै-पाहुण्यांची उमेदवारांना मदत होते. माजी आमदार विलास लांडे यांचा शिरुर लोकसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवड आणि हवेली परिसरात मोठा गोतावळा आहे. हीच ताकद माजी महापौर संजोग वाघेरे यांच्याकडे होती. त्यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी देणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. लांडे, वाघेरे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. याउलट, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी महेश लांडगे यांच्याकडे जबाबदारी दिली. लांडगे यांनी नाती-गोती, पै-पाहुण्यांना आपल्या बाजुने केले आणि निवडणुकीत भाजपा पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला मदत झाली.
**
चिंचवड पोटनिवडणुकीतून बोध घेतला नाही…
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे शहर राष्ट्रवादीची जबाबदारी सोपवल्यापासून ज्येष्ठ- कनिष्ठ असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्याचा फटका आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकींमध्ये राष्ट्रवादीला बसला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही निवडणुकीचे प्रभावी दावेदार भाऊसाहेब भोईर असताना नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. भोईर यांच्यावर प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली असताना सर्वाधिकार मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे सोपवण्यात आले. परिणामी, राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. एका गटाने काटेंचे काम केले नाही. त्याचा फायदा भाजपाला झाला.


बाजार समितीचा निकालाचे संकेत काय?
बाजार समितीच्या निकाल म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. हवेली बाजार समितीचा विचार करता जिल्हा परिषदेत या निकालाचे पडसाद उमटणार असून, राष्ट्रवादीला वर्चस्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. शिरुर आणि मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघामध्ये पिंपरी-चिंचवड शहराची विभागणी झाली आहे. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सक्रीय नाहीत. मावळात श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपाची वाट मोकळी केली आहे. चिंचवडमध्ये जगताप कुटुंबीय आणि भोसरी व पिंपरीमध्ये आमदार लांडगे यांनी जोरदार मशागत सुरू केली आहे. याउलट, राष्ट्रवादी केवळ अजित पवार येतील आणि काहीतरी चमत्कार करतील, या भरोशावर आहे. त्यामुळे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी करताना ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे यांच्यासारख्या ‘‘मास लीडर’’ची शहर राष्ट्रवादीला आवश्यकता आहे. परंतु, आत्मकेंद्री राजकारणामुळे स्थानिक अतिमहत्त्वाकांक्षी नेत्यांनी लांडे यांना ‘मार्गदर्शक’रांगेत बसवून, राष्ट्रवादीला पराभावाच्या खाईत ढकलले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button