TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या ‘जोर बैठका’

नेतृत्वाच्या उपस्थित बैठकांचा सपाटा ; पक्षनिहाय घेतला जातोय आढावा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांची संपलेली मुदत, लोकसभेची संपणारी मुदत पाहता लवकरच निवडणुका लागतील अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत. हे चित्र पाहता सर्वच राजकीय पक्षांनी देखील दंड थोपटले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, मनसे, आरपीआय, वंचित या पक्षातील सर्वच नेत्यांनी बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. या मध्ये पक्षाचा आढावा, ध्येय धोरणे, राजकीय भूमिका आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

भाजपाच्या वतीने जिल्हा प्रभारी, संघटन प्रमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठका जोरात आहेत. त्यामध्ये पक्षनिहाय आढावा घेतला आहे. उमेदवारांची चाचपणी केली आहे. नवीन शहराध्यक्ष जाहीर केल्यानंतर इतर कार्यकारिणीसाठी इच्छुक असणाऱ्यांसोबत प्रभारींच्या नेतृत्वाखाली भेटीगाठी घेण्यात आल्या आहेत.

भाजपा बरोबरच दोन्ही शिवसेनेने देखील तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून खा. श्रीरंग बारणे तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांत असणाऱ्या आढळराव पाटील यांनी महापालिका कामकाजात लक्ष घालणार असल्याचे सूतोवाच केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. नुकतीच त्यांनी मावळ आणि शिरूर बाबत पक्षाच्या आढावा बैठकीत माहिती घेतली आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीही गटात विखुरली असल्याने सुरुवातीला पक्ष संघटनेत फेरबदल करण्याकडे दोन्ही गटाने लक्ष दिले आहे. निवडणुकीपूर्वी पदाधिकारी नेमण्याचा सपाटा सुरु केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून शहराध्यक्ष, महिला आघाडी, युवक अध्यक्ष यांच्या फेरनियुक्त्या तसेच आहे त्यांनाच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर दुसरीकडे खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी सातत्याने बैठकांतून राजकीय खलबते करत आहेत.

मनसे, आरपीआय सक्रीय…
मोठ्या पक्षांसोबत शहरात लहान ताकद असणारे इतर पक्ष देखील मैदानात उतरले आहेत. नुकतेच मावळ तालुक्यातील वरसवली गाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पिंपरी, चिंचवड विधानसभेचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मावळ लोकसभेचे संघटक रणजित शिरोळे, विधानसभेचे समन्वयक अमेय खोपकर यांनी आढावा घेतला. आरपीआयने महापालिकेच्या १५ जागांवर दावा ठोकत कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत. तर वंचित आणि काँग्रेसकडून देखील पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली पाहता निवडुकीला रंगत येणार हे मात्र निश्चित आहेच. मात्र शहरातील राजकीय नेत्यांनी देखील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्याचे पाहावयाला मिळत आहे.

भाजपाचे कार्यकारिणीवर लक्ष …
भाजपाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची निवड करण्यावर भर दिला आहे. शहराध्यक्ष पदाची निवड केल्यानंतर इतर पदावर काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यांची यादी बनविण्यात आली आहे. ही यादी पक्षनेतृत्वाकडे पाठवून मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर शहरात कार्यकारिणीद्वारे पक्ष संघटन बळकट करण्यात येणार असल्याचे चित्र आहे.

शिउबाठा गट उमेदवाराच्या शोधात…
शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंद केले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सध्या तरी कोणीही उमेदवार नसल्याचे दिसते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना या दोनही मतदारसंघात उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतही त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद द्यावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button