breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राजीव गांधींच्या मृत्युने राहिली गोयकरवाड्याची भेट; गावाचा कायापालट करणाऱ्या पारुबाईंना दिलेलं आश्वासन

अहमदनगर: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनाला आज २१ मे रोजी ३१ वर्षं झाली. पण, आजंही अहमदनगर जिल्ह्यातील गोयकरवाडा नावाच्या छोट्या गावाला आणि त्या गावातील पारुबाई चांडे यांना राजीव गांधींची आपल्या गावाला भेट देण्याची इच्छा अकाली मृत्यूमुळे अपूर्ण राहिली याची खंत आहे. आज वयाच्या पंच्याहत्तरीत असलेल्या पारुबाईंनी ३५ वर्षांपूर्वी गोयकरवाडा गावाचा असा काही कायापालट केला होता, की खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी या कायापालटाची दखल घेऊन पारुबाईंना भेटायला बोलावले आणि त्या गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते.

पारुबाई चांडे गोयकरवाडा गाव

गोयकरवाडा हे नगर जिल्ह्यातलं कर्जत तालुक्यातलं उघड्या बोडख्या माळरानावरचं गाव. एकदम व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी सारखं तंतोतंत वाटणारं मेंढपाळांचं गाव. ऐंशीच्या दशकात गावात प्यायला नीट पाणी नाही, रस्ता नाही, शाळा नाही, जवळपास दवाखाना नाही अशी गोयकरवाड्याची अवस्था होती. जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या पारुबाईंनी हे बदलायचं ठरवलं. गावातल्या महिलांना सोबत घेतलं. आपल्या गावात कोणकोणत्या गोष्टी प्राधान्यानं व्हायला हवं हे या महिलांना समजून सांगितलं. पारुबाईंच्या प्रयत्नांमुळे पाठोपाठ पुरुषही सहभागी झाले आणि मग श्रमदानातून गावाचा रस्ता तयार केला, पाण्यासाठी टाकी उभारली, माळरानावर वृक्षारोपण केलं, गावात बिनधुराच्या चुली झाल्या, बालवाडी झाली. या गोष्टींच्या उद्घाटनाला तत्कालीन जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाधीन क्षत्रिय, प्रशिक्षणार्थी आयएएस अजोय मेहता हे गोयकरवाड्यात आले होते. यातील दोघे पुढे राज्याचे मुख्य सचिव झाले.

पारुबाई चांडे गोयकरवाडा गाव

  • गोयकरवाड्याला येण्याचं राजीव गांधींचं आश्वासन

पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी गोयकरवाड्याची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचवली. पारुबाईंना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत नाश्त्यासाठी दिल्लीला आमंत्रित केलं गेलं. पारुबाईंनी राजीव गांधींची भेट घेऊन तब्बल अडीच तास गप्पा मारल्या. गोयकरवाड्याचा कसा कायापालट केला हे समजून घेतलं. पंचायत राज विधेयकाबाबतही राजीव यांनी पारुबाईंशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. पंचायत राजमध्ये ३० टक्के महिला आरक्षणाचे सूतोवाचही राजीव यांनी यावेळी केले. या चर्चेत राजीव गांधींनी गोयकरवाड्याला येण्याचं आश्वासन दिलं होतं. नकाशा मागवून नेमके गोयकरवाडा हे गाव कुठे आहे तेही राजीव गांधी यांनी पारुबाईंच्या समोरच समजून घेतले. पण, पुढे सत्ताबदल झाला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत १९९१ मध्ये राजीव यांची हत्या झाली, त्यामुळे गोयकरवाडा भेट राहिली. याची खंत पारुबाईंना आणि गोयकरवाडावासीयांना आहे. आपल्या कामाची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतली याचा अभिमान पारुबाईंना आहेच, पण त्यांची गावाची भेट राहिली ही खंत आज ३१ वर्षांनंतरही कायम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button