भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची कार दिल्लीतून चोरीला
J P Nadda | भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत १९ मार्च रोजी हा प्रकार घडला आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नीची कार चोरीला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांच्या नावावर या कारची हिमाचल प्रदेशमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. फॉर्च्युनर कंपनीची ही कार त्यांचा चालक जोगिंदर सिंग गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेला होता. तिथून परत आल्यानंतर दिल्लीच्या गोविंदपुरी भागातील आपल्या घरी जेवणासाठी तो गेला. यावेळी कार त्याच्याकडेच होती. तिथूनच ही कार चोरीला गेल्याचं निष्पन्न झालं आहे.
हेही वाचा – प्रणिती शिदेंचं भाजपचे उमेदवार राम सातपुतेंना पत्र, सोशल मीडियावर चर्चा
१९ मार्च रोजी दुपरी ३ च्या सुमारास ही कार सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला नेली होती. यानंतर चालक दुपारच्या जेवणासाठी घरी गेला. मात्र, परत आल्यावर तिथे कार दिसली नसल्याची माहिती जोगिंदर सिंगनं पोलिसांना दिली. पोलिसांनी महामार्गांवरील सीसीटीव्ही तपासले असता ही कार दिसल्याचं सांगितलं जात आहे. ही कार गुरगावच्या दिशेनं जाताना दिसली असून त्याअनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.