TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

हमी मिळाल्यानंतरही गौतम नवलखा कारागृहातच

मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची मागणी केली असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली होती. तसेच नवलखा यांच्यासाठी हमीदार राहणाऱ्या व्यक्तीलाही त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही नवलखा नजरकैदेत राहणार असलेल्या नवी मुंबईतील जागेच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी प्रश्न उपस्थित केला. परिणामी हमीदार न्यायालयात उपस्थित राहूनही नवलखा यांची कारागृहातून सुटका होणे लांबणीवर पडले.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या बुधवारी उपस्थित राहिल्या. तसेच त्यांनी नवलखा यांच्या हमीदार म्हणून उपस्थित राहिल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही त्यांना नवलखा यांची हमीदार म्हणून मान्यता दिली. परंतु त्यानंतर नवलखा हे नवी मुंबईतील ज्या घरात नजरकैदेत राहणार आहेत, त्या जागेच्या सुरक्षेबाबत एनआयएतर्फे प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच या जागेच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. तोपर्यंत नवलखा यांना तळोजा कारागृहातून नवी मुंबईतील घरात हलवण्यात येऊ नये, अशी विनंती केली. न्यायालयानेही त्याची दखल घेऊन नवलखा यांना तेथे नजरकैदेत ठेवणे योग्य होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

 आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी मान्य केली होती. नवलखा यांना एक महिन्यासाठी नजरकैदेत ठेवण्याचे आणि याबाबतच्या आदेशाची ४८ तासांत अंमलबजावणी करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु आवश्यक त्या प्रक्रियेअभावी नवलखा यांची कारागृहातून अद्याप सुटका झालेली नाही.

सुहासिनी मुळय़े हमीदार

हमीदार प्रमाणपत्राबाबतही प्रश्न निर्माण झाला असता अशा प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतरही सुहासिनी मुळय़े या नवलखा यांच्या हमीदार म्हणून बुधवारी न्यायालयात उपस्थित झाल्या. त्यामुळे नवलखा यांची कारागृहातून सुटका होऊन त्यांना नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची अपेक्षा होती. मात्र एनआयएने त्या जागेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आणि न्यायालयानेही त्याची दखल घेतल्याने नवलखा यांची कारागृहातील मुक्काम लांबला आहे. दरम्यान, नवलखा यांना आपण गेल्या ३० वर्षांपासून ओळखत असल्याचे मुळय़े यांनी न्यायालयाला सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button