ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रांजळ अनुभवकथन मनाला भावते! : ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव

पिंपरी चिंचवड | “‘एक झुंज’ हे प्रांजळ आत्मकथन मनाला भावते; तसेच ‘अस्वस्थ वर्तमानपत्रातील मी’ या कवितासंग्रहातील कविता सद्य:स्थितीचे दाहक वास्तव अधोरेखित करतात!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी हिमगौरी सहकारी गृहरचना संस्था, यमुनानगर, निगडी येथे रविवारी व्यक्त केले.आंतरधर्मीय प्रेमविवाह, जगात वावरताना आलेले भलेबुरे अनुभव, आयुष्याच्या संध्याकाळी पतीच्या जीवघेण्या आजारांमध्ये खंबीर राहून केलेली शुश्रूषा अशा विविध अनुभवांचे लेखन माधुरी डिसोजा कुमठेकर यांनी आपल्या ‘एक झुंज’ या आत्मकथनपर पुस्तकात केले आहे; तर ज्येष्ठ साहित्यिक बाबू फिलीप डिसोजा यांनी ‘अस्वस्थ वर्तमानातील मी’ या त्यांच्या चौथ्या काव्यसंग्रहात वर्तमानकाळातील सत्य परिस्थितीला काव्यरूप दिले आहे.

या दांपत्याच्या या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन राज अहेरराव यांच्या हस्ते करण्यात आले. रंगकर्मी उज्ज्वला केळकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, “प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक पुस्तक असते. या पुस्तकाची भाषा साधी, सोपी असेल तर त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते!” असे भावोद्गार काढून बाबू डिसोजा यांच्या प्रकाशित संग्रहातील ‘तिमिरपर्व’ या कवितेचे अभिवाचन केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माधुरी डिसोजा यांनी, “पतीचा भक्कम पाठिंबा, संपूर्ण परिवाराची साथ यामुळे आयुष्यात आजपर्यंत आलेल्या अनुभवांचे सत्यकथन ‘एक झुंज’ या पुस्तकात मांडता आले!” अशी कृतार्थ भावना व्यक्त केली; तर बाबू डिसोजा यांनी, “नावातच माधुर्य असलेल्या माधुरी यांनी सकारात्मक पद्धतीने आपल्या कटू अन् गोड अनुभवांना शब्दबद्ध केले आहे;

परंतु माझ्या कविता या सभोवतालच्या वर्तमानकालीन वास्तवाचे कटूदर्शन घडविणाऱ्या आहेत!” या शब्दांत आपल्या काव्यलेखनाची भूमिका विशद केली. यावेळी हेमंत वैद्य यांनी माधुरी आणि बाबू डिसोजा कुमठेकर या दांपत्याच्या सहजीवनाची वाटचाल प्रभावीपणे कथन करून उपस्थितांना सद्गदित केले.

राज अहेरराव पुढे म्हणाले की, “आपल्या आयुष्यातील चोवीस महत्त्वाचे प्रसंग माधुरी डिसोजा यांनी ‘एक झुंज’ या पुस्तकात शब्दांकित केले आहेत. खरं सांगायचे तर या आत्मकथनामध्ये एका महाकादंबरीची बीजे दडलेली आहेत. पूर्वसुरीतील प्रथितयश लेखिकांच्या अभिजात साहित्यकृतींचा सखोल अभ्यास केला तर माधुरी डिसोजा यांची लेखणी कादंबरीलेखनाचे आव्हान सहज पेलू शकेल. ‘अस्वस्थ वर्तमानातील मी’ या कविता म्हणजे भावनांच्या काळजावरील जखमांचा मूर्त आविष्कार होय!”

सरस्वतीची प्रतिमा आणि तुकोबांचा गाथा यांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत परंतु अतिशय भावपूर्ण वातावरणात हा हृद्य सोहळा संपन्न झाला.

डॉ. साईप्रसाद कुमठेकर, सुप्रिया कुमठेकर, पूजा कुमठेकर, प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रजनी अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिनंदन कुमठेकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button